सामाजिक

आचार्य प्र. के. अत्रे

लेखणी आणि वाणी यांच्या साहाय्याने अर्धशतकाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणारं व्यक्तिमत्त्व म्हणून आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची ओळख आहे. कवी, लेखक, नाटककार, विनोदकार, चित्रपटकथा लेखक, वृत्तपत्रकार, संपादक, प्रभावी वक्ते, वादविवादपटू, शिक्षणतज्ज्ञ, अस्सल मराठी बाजाचे खुमासदार लेखन करणारे सव्यसाची लेखक आचार्य अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे ) यांची आज पुण्यतिथी. या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने मानदंड निर्माण करत आपल्या कार्याचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला.
अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ला पुणे जिल्ह्यातील सासवडजवळच्या कर्हा नदीच्या काठावर वसलेल्या कोडीत या गावी झाला. त्यांचे वडील म्यॅट्रिकपर्यंत शिकलेले होते. त्यांचं घराणं शिवकालीन ऐतिहासिक घराण्यांपैकी एक वतनदार घराणं होतं. बापू हे अत्र्यांचं लहानपणचं टोपणनाव. अत्र्यांचं प्राथमिक शिक्षण सासवड इथे झालं. अत्र्यांची आई कलासक्त होती. तिच्यामुळेच त्यांना विविध कलांची, विशेषता नाटकाची आवड लागली. शिवाय सासवड आणि परिसरातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण, ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांच्या बालपणाच्या जडणघडणीस पोषक ठरली. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी एक विनोदी कविता लिहिली आणि आपल्यातील विनोदी लेखकाची चुणूक दाखवून दिली. वाचनाची आवड त्यांना तिथल्या वातावरणातच लागली.
१९११ साली पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्या काळात कला, विद्या, आणि ज्ञान यांचं माहेरघर असलेल्या पुण्याने अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खर्या अर्थाने आकार दिला. भावे हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना काशिनाथ नारायण पटवर्धन, ‘दर्पदर्पणकार’ चिपळूणकर, पुरुषोत्तम लेले, विद्याधर वामन भिडे असे काही दिग्गज लेखक शिक्षक म्हणून लाभले. नाटकाविषयीची गोडी त्यांना इथल्या वातावरणामुळेच लागली. इथल्याच नाटकांतून त्यांना मराठी रंगभूमीवर प्रवेश करण्याची संधी मिळाली. शालेय वयातच त्यांना राम गणेश गडकरी, बालकवी, तात्यासाहेब कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, रे. टिळक अशा दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभला. गडकर्यांनी त्यांच्या कविता वाचून त्यांना पसंतीची पावतीही दिली. शालेय वयातच अत्र्यांनी ‘महाराष्ट्र मोहरा’ ही कादंबरी लिहिली आणि ‘प्रेमोद्यान’ मासिकातून ती क्रमश: प्रसिद्धही झाली. अत्र्यांचं प्रसिद्ध झालेलं हे पहिलं लिखाण. पुढे त्यांनी गोष्टीही लिहायला सुरुवात केली आणि त्या विविध मासिकांत प्रसिद्ध होवू लागल्या. याच काळात त्यांना वक्तृत्त्व कलेचीही आवड लागली. अनेक भाषणं मुखोदगत करत त्यांनी विविध स्पर्धा गाजवल्या.
भावे हायस्कूलमधून म्यॅट्रिकची परीक्षा पास होताच महाविद्यालयीन शिक्षणासाठी अत्र्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही त्यांच्या जडणघडणीस समृद्ध असं वातावरण लाभलं. इथे त्यांना कविता आणि क्रिकेट या दोन गोष्टींविषयी जिव्हाळा वाटू लागला. या काळात त्यांचं राम गणेश गडकरी यांच्या घरी येणं-जाणं होऊ लागलं. गडकर्यांनी त्यांना आधुनिक कवितेचा मार्ग दाखवला. केशवसुत-गोविदाग्रज-बालकवी यांच्या कवितांची मोहिनी त्यांच्यावर होतीच. त्यामुळेच कॉलेजच्या त्रैमासिकात त्यांनी ‘मकरंद’ या टोपण नावाने कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांचे बरंच कौतुक त्यावेळी झालं. पुढे त्याकाळी प्रतिष्ठित असलेल्या ‘मासिक मनोरंजन’ या नियतकालिकात त्यांची ‘चांदणी’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्याच बरोबर ‘उद्यान’ नावाच्या प्रसिद्ध असलेल्या मासिकातही त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. कॉलेजच्या काळातच त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलय तयार झालं. कॉलेजच्या विविध साहित्यिक उपक्रमांतही ते हिरिरीने सहभाग घेत असत. रॅंग्लर परांजपे, प्रा. हरिभाऊ लिमये, डॉ. पांडुरंग दामोदर गुणे, प्रा. खाड्ये, वासुदेव बळवंत पटवर्धन अशी नामवंत शिक्षकमंडळी त्यांना इथे लाभली. कॉलेजच्याच वाडिया ग्रंथालयात अत्रे यांना मुबलक साहित्य वाचायला मिळालं. विशेषत: इंग्रजी भाषेतील काव्यं, कादंबर्या, नाटकं त्यांनी अधाश्यासारखी वाचून काढली. त्यांच्या आयुष्यातल्या लेखनाची ही पूर्वतयारीच ठरली .
याच काळात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. १९१९ मध्ये त्यांचं दैवत असलेले राम गणेश गडकरी यांचंही निधन झालं. हे दोनही आधार कोसळल्यामुळे अत्रे असहाय झाले. त्यांचं बी. ए.च्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष झालं. त्याचा परिणाम होऊन ते ही परीक्षा १९१९ साली अक्षरश: काठावर पास झाले. त्यानंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईत आले. सुरुवातीला काही छोट्या नोकर्या केल्यानंतर त्यांना १९२० साली न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्याच काळात वडिलांची आपल्या मुलाने वकील व्हावं ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कायदा शिक्षणाच्या पदवीसाठीही प्रवेश घेतला. पण पुढे १९२१मध्ये प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई सोडावी लागली आणि ते परत पुण्यात परतले. त्यामुळे त्यांनी वकील व्हायची वडिलांची इच्छा अपुरीच राहिली.
पुण्यात आल्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांची हेडमास्तर म्हणून महिना ३५ रुपये पगारावर नेमणूक झाली. या शाळेत त्यांनी अनेक शैक्षणिक बदल करून शाळा नावारूपाला आणली. त्यामुळे ही शाळा ‘अत्रे यांची शाळा’ म्हणून ओळखली जाऊ लागली. दरम्यान, अध्यापनशास्रातील बी. टी. (मुंबई) आणि पुढे लगेच टी. डी. (लंडन) या पदव्या त्यांनी सन्मानपूर्वक प्राप्त केल्या. लंडन इथे त्यांना जागतिक कीर्तीच्या शिक्षणतज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभलं. त्यातूनच त्यांना नवशिक्षणाचा विचार मिळाला. त्याचा आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीत प्रचार-प्रसार करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यातूनच अत्रे यांनी प्राथमिक शाळांसाठी ‘नवयुग वाचनमाला’ आणि माध्यमिक शाळांसाठी ‘अरुण वाचनमाला’ वि. द. घाटे आणि कवी गिरीश यांच्या सहकार्याने सुरू केल्या. या मालांच्या उच्च गुणवत्तेमुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना अधिकृत मान्यता दिली आणि हीच क्रमिक पुस्तकं शाळांतून शिकवली जाऊ लागली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत व जिवंत वाड्मयाची व विचारांची ओळख करून देण्याचा हा प्रयोग राबवणं हे अत्र्यांनी केलेलं फार मोठं आणि महत्त्वाचं शैक्षणिक कार्य मानलं जातं. पुढे त्यांनी पुण्यात धनराज गिरी हायस्कूल आणि मुलींचं आगरकर हायस्कूलही सुरू केलं.
साहित्याच्या प्रांतात १९२१ नंतर त्यांनी केशवकुमार या नावाने कविता लिहायला सुरुवात केली. १९२३च्या आसपास पुण्यात सुरू झालेल्या रविकिरण मंडळाच्या कवींची कविता लोकप्रिय होत होती. अत्रे यांनी माधव ज्युलियन आणि या मंडळातील इतर कवींच्या कवितांची विडंबनं लिहावयास सुरुवात केली. या मंडळातील कवींच्या काव्यावृत्तींचा उपहास करणारी ही विडंबनं खूप लोकप्रिय झाली. त्याचाच ‘झेंडूची फुले’ (१९२५) हा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. विडंबन कविता मराठीत आणायचं श्रेय अत्रे यांनाच दिलं जातं. त्यांनी शालेय-महाविद्यालयीन काळात लिहिलेल्या कवितांचा ‘गीतगंगा’ (१९३५) हा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला.
महाविद्यालयीन काळातच राम गणेश गडकरी या थोर नाटककाराचा सहवास त्यांना लाभल्यामुळे त्यांना नाट्यलेखनकलेचं रहस्यही उमगलं. गडकर्यांच्या तसंच त्यांच्या इतर समकालीन नाटककारांच्या नाटकांमुळे अत्रे विशेष प्रभावित झाले. नाटकांमध्ये त्यांनी भूमिकाही केल्या. सुरुवातीला शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी त्यांनी ‘गुरुदक्षिणा’, ‘वीरवचन’ व ‘प्रल्हाद’ अशी नाटकं लिहिली. १९३३ साली ‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी यांच्या विनंतीवरून अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक लिहिलं. १० मे १९३३ रोजी पुण्याच्या विजयानंद थिएटरमध्ये त्याचा प्रयोग झाला. त्यांचं हे पहिलंच विनोदी नाटक चांगलंच यशस्वी झालं. पुढच्या काळात त्यांनी आलटून-पालटून विनोदी, प्रहसनात्मक, गंभीर नाटकं लिहिली. घराबाहेर (१९३४), उद्याचा संसार (१९३६), पराचा कावळा (१९३८), वन्दे मातरम (१९३७), मी उभा आहे(१९३९), जग काय म्हणेल(१९४०), पाणिग्रहण(१९४६), कवडीचुंबक(१९५०), आणि शेवटच्या काळात (१९६२ ते १९६९) तो मी नव्हेच, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, डॉक्टर लागू, प्रीतिसंगम, ब्रम्हचारी ही त्यांची नाटकं रंगभूमीवर आली व लोकप्रिय ठरली. १९३० नंतर चित्रपटांकडे वळलेल्या प्रेक्षकाला रंगभूमीकडे खेचून आणण्यात अत्र्यांच्या नाटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठी रंगभूमीला त्यामुळे पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. ‘तो मी नव्हेच’ (१९६२) हे पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचाचं तंत्र वापरून त्यांनी सादर केलेलं नाटक त्यातल्या समकालीन सत्य घटनेच्या ताज्या संदर्भामुळे विशेष गाजलं. त्यामुळे नाट्यतंत्रातही क्रांती झाली.
नाटकांच्या बरोबरीने त्यांनी विनोदी लेखनही भरपूर केलं. साखरपुडा (१९४२), ब्रॅंन्डीची बाटली (१९४४), वामकुक्षी (१९४९) हे त्यांचे विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची चांगुणा (१९५४) ही कादंबरीही प्रसिद्ध आहे. याचबरोबर त्यांनी चित्रपटलेखनही केलं. १९३७ ते १९३९ या काळात त्यांनी बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायक यांच्या ‘हंस पिक्चर्स’करिता धर्मवीर, प्रेमवीर, ब्रम्हचारी, बेगुनाह (हिंदी), ब्रान्डीची बाटली व अर्धांगी अशा चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. पुढे १९४० साली मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक झाल्यानंतर त्यांनी स्वत:चीच ‘अत्रे पिक्चर्स’ ही कंपनी सुरू केली. ‘श्यामची आई’, ‘महात्मा फुले’ असे काही दर्जेदार चित्रपट त्यांनी निर्माण केले. साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला १९५४ मध्ये राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णपदक, तर ‘महात्मा फुले’ या चित्रपटाला १९५५ मध्ये रौप्यपदक देऊन गौरवण्यात आलं.
मराठी साहित्यात त्यांचे अनेकांशी वाद झाले. अत्रे-भावे वाद, अत्रे-फडके वाद, अत्रे-वरेरकर वाद असे वाद प्रसिद्ध आहेत. पुरोगामी दृष्टिकोन आणि भूमिकेतून त्यांनी हे वाद लढवले.
मराठी वृत्तपत्रकारितेतही अत्र्यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. याचा प्रारंभ त्यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाने झाला. १९३७ साली त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या वर्षीच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरून ते निवडूनही आले. १९३८ ते १९३९ या काळात ते स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन झाले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या. कांग्रेसच्या राजकारणाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी ‘नवयुग’ साप्ताहिक सुरू केलं. त्यातील ‘अत्रे उवाच’ या अग्रलेखांमुळे आणि पुढे दत्तू बांदेकरांच्या विनोदी सदरामुळे ‘नवयुग’ अतिशय लोकप्रिय झाले. ‘जय हिंद’ नावाचं सायंदैनिकही त्यांनी काही काळ चालवलं. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे अत्र्यांनी कॉंग्रेसचा निषेध केला आणि त्यांनी कॉंग्रेस सोडली. पुढच्या काळात ते कॉंग्रेसचे कट्टर विरोधक बनले. १९५५ साली सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं नेतृत्व अत्र्यांनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रसारासाठी त्यांनी १९५६ मध्ये ‘मराठा’ नावाचं दैनिक सुरू केलं. ‘नवयुग’ आणि ‘मराठा’तून प्रखर जहाल लिखाण करून अत्र्यांनी या चळवळीचा विलक्षण झंझावाती असा परिणामकारक प्रचार-प्रसार केला. या दोन्ही वृत्तपत्रांतून वैविध्द्यपूर्ण विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यातील काही लिखाण पुढे पुस्तकरूपानं प्रसिद्ध झालं.
चरित्र, आत्मचरित्र, आणि व्यक्तिचित्रं याचबरोबर त्यांनी लिहिलेले मृत्युलेख हेही त्यांच्या लिखाणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. ‘मी कसा झालो’ (१९५३) आणि ‘कर्हेचे पाणी’ हे सहा खंडात प्रसिद्ध झालेलं आत्मचरित्र यातून केवळ अत्रे या व्यक्तीचे चरित्र आलं नसून तत्कालीन काळ, माणसे आणि घटना यांचंही वैविध्यपूर्ण चित्रण आलं आहे. त्यांनी लिहिलेली ‘सूर्यास्त- (पं. नेहरू), ऑस्कर वाइल्ड, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, अब्राहम लिंकन, विनोबा ही चरित्रंही महत्त्वाची आहेत. याचबरोबर भ्रमंती (१९५६), मुद्दे आणि गुद्दे’ (१९५६), केल्याने देशाटन (१९६१). समाधीवरील अश्रू (१९६९), आषाढस्य प्रथम दिवसे (१९६९), अध्यापक अत्रे (१९८५), हुंदके (१९८९) इत्यादी पुस्तकंही महत्त्वाची आहेत. त्यांच्या गाजलेल्या भाषणांचेही अनेक संग्रह प्रसिद्ध आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांशा, सुख-दुखं, भाव-भावना, जीवनविषयक समस्या त्यांनी आस्थेने समजून घेतल्या आणि त्यासबंधी भरपूर लेखन केलं. प्रसंगी समाजातील दोषांवर घणाघाती हल्ला चढवण्यासही त्यांच्यातील लेखक-पत्रकार-वक्त्याने कुणाची भीडभाड बाळगली नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरून दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. तिथेही त्यांनी विविध सामाजिक-राजकीय प्रश्नांवर आवाज उठवला. १९६७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीलाही उभे राहिले पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्तच राहिले.
एवढ्या सगळ्या क्षेत्रांवर हुकमत गाजवलेले अत्रे खर्या अर्थाने गाजले ते एक झुंजार पत्रकार आणि लेखक म्हणून. अत्र्यांच्या सर्वच लेखनातून विनोदाचा झरा खळाळताना दिसतो. मानवी वर्तनातील, स्वभावातील विसंगती त्यांनी विनोद हे माध्यम वापरून त्यांच्या लिखाणातून टिपली. त्यांचा विनोद अनेकदा अनेकांना बोचणारा ठरला. कधी कधी त्यात व्यक्तिद्वेष, बाष्कळपणा, शिवराळपणाही जाणवतो, परंतु ताजेपणा आणि जिवंत उत्स्फुर्तता यामुळे त्यात एक नावीन्यही सामावलेलं आहे. हा विनोद त्यांच्या फर्ड्या भाषणातही होता. अत्र्यांचं एकूणच व्यक्तिमत्व धाडसी आणि आक्रमक होतं. लेखक, पत्रकार, वक्ते, विनोदकार म्हणून अत्रे प्रचंड लोकप्रिय ठरले त्याचं रहस्य कदाचित त्यांच्या या आक्रमक वृत्तीत सामावलं असावं.
आयुष्यात अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालून आले. मुंबई इथे १९४१ साली भरलेल्या एकविसाव्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं, त्याचबरोबर १९४२ साली नाशिक येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधीही त्यांना मिळाली.
मराठी माणूस आणि मराठी भाषा ज्यांचा मानबिंदू होता, काव्य, नाटक, शिक्षण, पत्रकारिता, चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत ज्यांनी आपल्या असामान्य कर्तुत्त्वाने अमिट असा ठसा उमटवला अशा आचार्य प्र. के. अत्रे यांचं १३ जून १९६९ रोजी मुंबईत निधन झालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button