सामाजिक

अक्कलकोट तालुक्यातील सात बंधाऱ्यांच्या बॅरेज रूपांतरण सर्वेक्षणास ९५.४९ लाखांची मंजुरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : अक्कलकोट तालुक्यातील जलसिंचन आणि भूजल संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या सात बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी ९५.४९ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्राथमिक प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.भीमा कालवा मंडळ, सोलापूर यांनी सन २०२६-२७ च्या आवश्यक कामांच्या प्रापणसूचीमध्ये या कामांचा समावेश करून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार भीमा नदीवरील खानापूर, हिळळी तसेच सीना नदीवरील कोर्सगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामासाठी ४०.४९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.तसेच बोरी नदीवरील अक्कलकोट, मिरजगी, संगोगी (बु.) आणि बबलाद येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या बॅरेज रूपांतरणासाठी आवश्यक सर्वेक्षण व अन्वेषणाच्या कामासाठी ५५ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.या सर्वेक्षणामध्ये नदीपात्राची भौगोलिक व तांत्रिक पाहणी, पाणी साठवण क्षमता, भूगर्भीय अन्वेषण, आवश्यक संरचनात्मक आराखडा तसेच प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे पुढील टप्प्यात बॅरेज उभारणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.बॅरेज उभारणीमुळे पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी अधिक काळ नदीपात्रात साठवून ठेवणे शक्य होणार असून, परिसरातील भूजल पातळीत वाढ, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढ, पिण्याच्या पाण्याचा अधिक शाश्वत स्रोत आणि शेती उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना दीर्घकालीन जलसुरक्षेचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे भविष्यात संबंधित बंधाऱ्यांचे आधुनिकीकरण होऊन स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि पाणीटंचाईग्रस्त भागांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तसेच याकामी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया -अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील सिंचन व्यवस्था आणखी बळकट बनवून शेतकरी बांधवाना आणि नागरिकांचा आर्थिक स्तर आणखी उंचावण्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेस सर्वेक्षण कामास पाठपुरावा करून मंजुरी मिळाली आहे.येत्या काळात पुढील कामास सुद्धा पाठपुरावा करून सिंचन व्यवस्था सुधारण्यास प्राधान्य देण्यात येईल 
सचिन कल्याणशेट्टी 
आमदार अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button