सामाजिक

अधिक मासानिमित्त स्वामींच्या महाप्रसादासाठी अक्कलकोट येथे स्वामी भक्तांची मांदियाळी ! 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अधिक मासानिमित्त परगावच्या भाविकांची संख्या वाढली आहे. अधिक मासानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी भक्तांची मांदियाळी दिसत आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे परगावच्या स्वामी भक्तांनी फुलून गेले असून दररोज हजारो भाविक भक्त हे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.
 हिंदू धर्मात अधिक मासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे .देवदर्शन आणि अन्नदान सेवा हे अधिकमासात महत्त्वाचे मानले गेले आहेत. अक्कलकोट तीर्थक्षेत्री सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी परगावच्या भाविकांची संख्या वाढली आहे. अधिकमासाचे औचित्य साधून दररोज हजारो भाविक हे अक्कलकोट नगरीत येत आहे. गुरुवार , शनिवार ,रविवार आदी दिवशी हजारो भाविक हे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत आहेत. यामध्ये राज्यातील मुंबई , पुणे ,नाशिक , कोल्हापूर , छत्रपती संभाजी नगर ,उस्मानाबाद , विदर्भ , मराठवाडा , खानदेश , सातारा ,सांगली आदींच देशाच्या विविध भागातून स्वामीभक्त दर्शनासाठी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत येत आहेत. दर्शनासाठी आलेले भाविक भक्त हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. गुरुवार , शनिवार , रविवार या दिवशी ३५ ते ४० हजार भाविक भक्त हे दोन वेळा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन भाविक तृप्त होत आहेत. अन्नछत्राच्या परिसरात अमूलाग्र बदल झाले असून नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल सुरु आहे. तात्पुरत्या व देखण्या अशा महाप्रसादगृहामध्ये खूप सुधारणा होऊन हा हॉल म्हणजे दरबार हॉलच झाला आहे. आतील प्रकाशमान असणारी असंख्य झुंबरे आणि त्यावरील नक्षीदार असे सीलींग भक्तांचे लक्ष वेधून घेतात. तसेच त्यालगत मान्यवर अतिथींचा आश्रयदाते कक्ष, त्यावर अतिमहत्त्वाच्या मान्यवरांसाठी व्हीव्हीआयपी असे दोन सूट व त्यावर मान्यवरांसाठी महाप्रसाद कक्ष आणि येण्या-जाण्यासाठी लिफ्टची सुविधा सर्व देखणे व स्वप्नवत वाटावे असे आहे. तसेच परिसरात डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाप्रसादागृहासमोरच कपीला गाय, देखण्या दिपमाला, श्री स्वामींची २५ फूटी मुर्ती, वारुळातून प्रकटले स्वामी मूर्ती इ. बाबी आणि भक्तांना मार्गदर्शक असा एलईडी बोर्ड तद्वत परिसरात गणेश मंदिरालगत स्टेजवर छत्रपती शिवरायांचा १२ फुटी अश्वारुढ पुतळा व भोवताली गड, किल्ले, सृष्टी  अशी शिवसृष्टी लाखो रुपये खर्चुन निर्मिती करण्यात आली आहे. अन्नछत्र मंडळातील बाल उद्यान हे भाविकांना व स्थानिकानां आकर्षित करत आहे.
परगावच्या भाविकांना महाप्रसादासह निवासाची उत्तम व्यवस्था श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात केली जात आहे. परगावच्या भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था होण्यासाठी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले ,सचिव शामराव मोरे ,उपाध्यक्ष अभय खोबरे व विश्वस्त मंडळ , कर्मचारी , सेवेकरी वर्ग परिश्रम घेत आहेत. अधिक मासानिमित्त स्वामींच्या महाप्रसादासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भाविक भक्तांची मांदियाळी दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button