सोलापूर

भीमा नदीकाठावरील वीजपुरवठा खंडित आदेश रद्द करून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढवावा; – खासदार प्रणिती शिंदे 

 

सोलापूर – ( प्रतिनिधी )भीमा नदीकाठावरील शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी देण्यात आलेला आदेश रद्द करून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढवावा आणि वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

उपअभियंता व जलसंपदा अधिकारी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा तसेच भीमा नदीकाठावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून 28 एप्रिल 2026 पासून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी सोडण्यात आले असून त्याचा गैरवापर होऊ नये व शेतीपंपांद्वारे उपसा होऊ नये यासाठी नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
मात्र या निर्णयाचा थेट परिणाम शेती व्यवसायावर होत असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने शेतीची कामे, पिकांची निगा आणि सिंचन व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून वाडी-वस्त्यांवरील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि धरणातून पाणी उशिरा सोडल्याने नदीकाठची पिके जळण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश तात्काळ रद्द करून वीज पूर्ववत सुरू करावी, तसेच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढवून ते शेवटच्या टोकापर्यंत वेळेत पोहोचेल यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

आज खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना हे निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केले. यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश पवार, उत्तर काँग्रेस तालुकाध्यक्ष भारत जाधव, दक्षिण काँग्रेस तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार उपस्थित होते.

दरम्यान, मोतीलाल चव्हाण, सुदर्शन आवताडे, रमेश हसापुरे आदी पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button