एमपीएससी गट-ब भरती वादात; SC प्रवर्गासाठी शून्य जागांवरून संताप, वंचित बहुजन आघाडीची स्पष्टीकरणाची मागणी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी एकही जागा नसल्याचा मुद्दा समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे.या भरतीअंतर्गत एकूण ५५२ पदांची घोषणा करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI) आणि सहाय्यक विभाग अधिकारी (ASO) या पदांचा समावेश आहे. ही परीक्षा १४ जून २०२६ रोजी होणार असून अर्ज प्रक्रिया १० एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान सुरू आहे.
मात्र अधिकृत जाहिरातीत SC प्रवर्गासाठी शून्य जागा दाखवण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने तीव्र प्रतिक्रिया देत, हा प्रकार केवळ प्रशासकीय त्रुटी म्हणून पाहता येणार नसल्याचे म्हटले आहे. सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी संबंधित गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण देऊन वास्तविक परिस्थिती स्पष्ट करावी, तसेच प्रवर्गनिहाय जागांचा तपशील पारदर्शकपणे जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संवेदनशील विषयांवर अस्पष्टता ठेवणे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखे असल्याची टीका करत, आरक्षण हा संविधानिक अधिकार असून त्यावर कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे आघाडीने ठामपणे सांगितले आहे.
तसेच, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आपण ठामपणे उभे आहोत, असा इशारा देत PSI पदासाठी वयोमर्यादा वाढवण्याची मागणीही आघाडीने केली आहे.


