महाराष्ट्र

कॅप्टन अशोक खरातच्या कुकृत्यांचा पर्दाफाश; ‘त्या’ व्हिडीओमुळे फुटले बिंग

 एसआयटीकडून तपासाला वेग!

नाशिक – नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर महिलांच्या गंभीर लैंगिक शोषणाचे आणि अन्य अनेक गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर, राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत केले आहे. बड्या राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे लागेबांधे आणि या गुन्ह्यांची व्याप्ती नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्येही असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खरातचाच ऑफिस बॉय नीरज जाधव हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची स्वतः दखल घेत, पोलिस महासंचालकांना सखोल चौकशीचे आणि दोषींवर कठोर कारवाईचे थेट निर्देश दिले आहेत. यानंतर, राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने SIT ची स्थापना केली. या पथकाचे नेतृत्व पुणे येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) गट क्रमांक एक च्या समादेशक (IPS) तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. गुरुवारी नाशिक येथे दाखल होत गुन्हे शाखा युनिट एक च्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली व तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी कर्मयोगीनगर येथील खरातच्या घराची झडती घेतली असता, तेथे सहा लाखांची रोकड सापडली. तसेच त्याच्या सिन्नर येथील फार्म हाऊसमधून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. त्याच्यावर वावी, शिर्डी आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून, या सर्व प्रकरणांची कागदपत्रे आता SIT ने ताब्यात घेतली आहेत. कॅनडा कॉर्नर भागातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये, ऑफिस बॉय नीरज जाधव याने कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले, ज्यामध्ये ५८ महिलांवरील गंभीर शोषणाचे चित्रण होते. या क्लिप्सच्या आधारे नीरज आणि त्याच्या साथीदारांनी खरातला ब्लॅकमेल करत तब्बल पाच कोटींची खंडणी मागितली. परंतु, खरातने पैसे देण्यास दाद न दिल्याने नीरजने थेट पीडित महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्याने शिर्डी येथील एका २४ वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावले. तिने खरातला याबाबत सांगितल्यावर, त्याने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता मावळल्याने नीरजने सिडको मधील एका २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ थेट तिच्या मेहुण्याला पाठवला. मेहुण्याने या कठीण काळात पीडितेला धीर दिला आणि तिला सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रवृत्त केले, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला.

या विशेष तपास पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, तांत्रिक पुरावे आणि केस डायरी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. सातपुते यांनी तपास सुरू केल्याने पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button