वंचित घटकातील खेळाडूंनी उंचावला देशाचा झेंडा; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून भारतीय संघाचे कौतुक

विजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकावर कब्जा
अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा दमदार खेळाचे प्रदर्शन करत जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. अहमदाबाद येथील मैदानावर खेळल्या गेलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर तब्बल ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर संपूर्ण देशभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत आक्रमक सुरुवात केली. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करत मोठी धावसंख्या उभारली. संयमी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित षटकांत भक्कम धावसंख्या उभी केली आणि न्यूझीलंडसमोर मोठे लक्ष्य ठेवले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे कोसळला. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजीला अक्षरशः गुडघे टेकायला लावले. नियमित अंतराने विकेट्स घेत भारतीय गोलंदाजांनी सामना एकतर्फी केला आणि अखेरीस न्यूझीलंडचा संघ ९६ धावांनी पराभूत झाला.
भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने दमदार सुरुवात केली. अभिषेक शर्माने अवघ्या २१ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी ४३ चेंडूत ९८ धावांची सलामी भागीदारी करत संघाला भक्कम पाया मिळवून दिला.
यानंतर संजू सॅमसनने ईशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १०५ धावांची भागीदारी केली. या सामन्यात सॅमसनने सलग तिसरे अर्धशतक झळकावले, तर ईशान किशननेही अर्धशतक पूर्ण केले. तथापि, १६ व्या षटकात दोघेही बाद झाले. सॅमसनचे शतक पुन्हा थोडक्यात हुकले. तो ४६ चेंडूत ८९ धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. दरम्यान, ईशान किशनने २५ चेंडूत ५४ धावा केल्या.
याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला, तर हार्दिक पांड्याने १३ चेंडूत १८ धावा केल्या. तिलक वर्मा सहा चेंडूत आठ धावा करून नाबाद राहिला. शेवटच्या षटकात शिवम दुबेच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला. दुबेने अवघ्या आठ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह २६ धावा करत नाबाद राहिला.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत जेम्स नीशमने चार षटकांत ४६ धावा देत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मॅट हेन्री आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मॅट हेन्रीने चार षटकांत ४९ धावा दिल्या, तर रचिन रविंद्रने दोन षटकांत ३२ धावा दिल्या. लॉकी फर्ग्युसन हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने केवळ दोन षटकांत ४८ धावा दिल्या.
भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर पोस्ट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले.
ते म्हणाले की, “हा विजय आपल्या राष्ट्राची खरी ताकद विविधतेत आहे याची प्रभावी आठवण करून देतो. बुमराह आणि अर्शदीपच्या स्विंग गोलंदाजीपासून ते संजू सॅमसनच्या धडाकेबाज फलंदाजीपर्यंत वंचित समाजघटकांतील खेळाडू देशाचा झेंडा सतत उंचावत आहेत. त्यांच्या समाजांना काहींकडून वाढत्या प्रणालीगत भेदभावाचा आणि द्वेषाचा सामना करावा लागत असला तरीही ते देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. खरा देशभक्तीभाव सर्वसमावेशकतेमध्ये आहे.” असे म्हणत त्यांनी भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


