सामाजिक
अक्कलकोट शहरात वाहतुकीचा खोळंबा ! पार्किंग व्यवस्थेचा उडाला फज्जा !

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत वाहतुकीचा खोळंबा होत असून याचा फटका हा स्थानिक नागरिकांना तसेच परगावच्या भाविकांना बसत आहे. परगावच्या भाविकांचीं वाहने ही रस्त्याच्या बाजूला उभी राहत असल्याने पार्किंग व्यवस्थेचा फज्जा उडाला आहे. यामुळे भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पोलीस प्रशासनाकडून पार्किंग व्यवस्थेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून तसेच परगावच्या भाविकातून केली जात आहे.
अक्कलकोट शहरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी शनिवारी , रविवारी परगावच्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. परगावच्या भाविकांच्या वाहनांच्या रांगा या शहरात सर्वत्र पहावयास मिळत होत्या. शहरातील हत्ती तलाव परिसरात बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने लावण्यात आल्याने या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. शनिवारी रात्री या परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परगावचे भाविक भक्त हे सर्रासपणे चार चाकी वाहनातून येत आहेत. परगावच्या वाहनांना वाहन तळाची व्यवस्था नसल्याने ही वाहने रस्त्याच्या बाजूलाच उभी करण्यात येत आहेत. गर्दीच्या काळात आणि सुट्ट्यांच्या काळात परगावच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था वेगळी करावी लागणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन , नगरपरिषद , श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान , तहसील प्रशासन यांनी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटात भाविक हे लाखोंच्या संख्येने येत आहेत. भाविकांच्या वाहनांमुळे अक्कलकोट शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे . याचा फटका शहरातील नागरिकांना अबालवृद्ध यांना बसत आहे .पोलीस प्रशासन हे गर्दीच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात उपाययोजना करत असते. पण हल्ली सलग गर्दी पडत असल्याने परगावच्या भाविकांच्या वाहनांसाठी वेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे. अक्कलकोट शहरात गर्दीच्या वेळी होणारी वाहनांच्या गर्दीचे नियोजन पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेने करावे लागणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेने उपाययोजना करून अक्कलकोट आतील स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट शहरात परगावच्या वाहनांची गर्दी रोखण्यासाठी मैंदर्गी रोड बायपास द्वारे श्री स्वामी समर्थ मंदिराकडे वाहनांना प्रवेश द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.



