महाबोधी महाविहार मुक्तीसाठी येत्या १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदानात सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेचा विराट मोर्चात सहभागी व्हावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / परंडा ( फारूक शेख )बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या आजही ताब्यात नाही. ज्या कर्मकांड पिंडदानाला अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते प्रकार महाबोधी महाविहार परिसरात होत असल्याने बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत.महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि कलेक्टर चेअरमन असतात.महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात नाही.त्यामुळे महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा १९४९ ज्याला बिटी ऍक्ट म्हटले जाते तो बी टी ऍक्ट रद्द झाला पाहिजे. भारताचे संविधान २६ जानेवारी १९५०रोजी लागू झाले असून त्यापूर्वीचा १९४९ चा बिहार विधानसभेचा बिटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे.महाबोधी महाविहार ट्रस्ट मधील सर्व ९ सदस्य आणि चेअरमन हे बौद्ध असले पाहिजेत.प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्माच्या ट्रस्ट कडे असतात.हिंदू मंदिरात हिंदू ट्रस्टी; मुस्लिमांच्या दर्गा ~ मशीद मध्ये मुस्लिम ट्रस्टी; शिखांच्या गुरुद्वारात शीख ट्रस्टी मग बौद्धांचे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? बौद्धांच्या महाबोधी बुद्धविहार ट्रस्ट मध्ये बौद्ध ट्रस्टी का नको? महाबोधी महाविहार बौद्धांचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे.महाबोधी महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे.या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट सर्व बौद्ध आंबेडकरी संघटना; सर्व पक्षीय बौद्ध नेते एकत्र आले असुन येत्या १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत प्रचंड संख्येने सर्व बौद्ध आंबेडकरी जनतेने ताकदीने सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या एकजुटीचे निमंत्रक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.या पत्रकार परिषदेस महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एकत्रित आलेले विविध पक्षांचे अनेक बौद्ध नेते ; विविध रिपब्लिकन गटांचे नेते उपस्थित होते.