शैक्षणिक
नागनहळळी आश्रम शाळेचे विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीकडून कौतुक !
गोरगरिबांच्या लेकरांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल प्रशंसा !
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील आश्रम शाळेच्या तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी आश्रम शाळांना भेटी दिल्या. विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी नागनहळळी आश्रम शाळेच्या कामाचे कौतुक करत गोरगरीब , वंचित ,भटक्या जाती जमातीतील जमातीतील लेकरांना मिळणाऱ्या विविध सुविधांबद्दल प्रशंसा केली. यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात नागनहळळी आश्रम शाळेची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुहास कांदे यांच्यासह सदस्य आमदार उमेश यावलकर ,आमदार देवेंद्र कोठे , आमदार प्रवीण स्वामी , आमदार अनिल मांगुळकर , आमदार अमोल मिटकरी ,आमदार धीरज लिंगाडे यांनी दिनांक २० ऑगस्ट रोजी अक्कलकोट तालुक्यातील आश्रम शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. या समितीने अक्कलकोट तालुक्यातील काही शाळांवर कारवाई केली. या समितीने नागनहळळी आश्रम शाळेच्या कामाचे कौतुक केले. व्हीजेएनटी कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुहास कांदे व सदस्यांनी नागनहळळी आश्रम शाळेतील गोरगरीब , वंचित , भटक्या जाती जमातीतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल प्रशंसा केले. नागनहळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल तसेच त्या ठिकाणी सेवेसाठी असणारे प्राचार्य , मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. नागनहळळी आश्रम शाळेचा आदर्श इतर संस्थानी घ्यावा अशी स्तुती आमदार सुहास कांदे व सदस्यांनी केले आहे. नागनहळळी आश्रम शाळेची भव्य इमारत ही सर्वांचे लक्ष वेधून घेते. नागनहळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांनी मोठ्या धाडसाने या ३० मार्च १९९४ साली कैलासवासी एच.एस. पाटील प्राथमिक आश्रम शाळेला शासनाची मान्यता मिळवून आणली. सुरुवातीला पत्र्याच्या तीन खोल्यात सुरू झालेला पहिलीचा वर्ग व नंतर एक एक वर्ग वाढवत सातवीपर्यंत वर्ग झाले .या संस्थेने २००४ साली के बी एन माध्यमिक आश्रम शाळा व २००८ रोजी केएसएम कनिष्ठ महाविद्यालयास मान्यता मिळवून आणले. इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सर्वांसाठी बंकर , गादीची सोय , मिष्ठान्नपूर्ण सात्विक भोजन , स्वतंत्र भोजनगृह , शौचालय , स्नानगृह यांची गुणवत्तापूर्ण सोय केली आहे. त्याचबरोबर सुसज्ज ग्रंथालय , प्रयोगशाळा , संगणक कक्ष यांची सोय करून गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या वाटा मुक्त करून दिल्या. नागनहळळी आश्रम शाळा ही गोरगरीब , वंचित , भटक्या , दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नवऊर्जा देणारे केंद्र ठरले आहे. सचिव जावेद पटेल यांनी ४०० ते ४५० मुला-मुलींचे पालकत्व स्वीकारून आदर्श निर्माण केला आहे. नागनहळळी आश्रम शाळेचा डंका हा शैक्षणिक , क्रीडा व सामाजिक क्षेत्रात वाजत आहे. याची पोचपावती म्हणून व्हीजेएनटी समितीने नागनहळळी आश्रम शाळा ही राज्यातील रोल मॉडेल असून या शाळेचा आदर्श घ्यावा अशी प्रशंसा केली आहे. याबाबत जावेद पटेल यांनी समाधान व्यक्त करत शिक्षण व सेवा हे वृत्त घेऊन पुढे जात आहे. ज्यांना दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे , त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळणार नाही. त्यांना आपलेसे करत उच्च शिक्षण देण्याचे काम मी करत आहे. या कामामुळे मला समाधान लाभले आहे अशी प्रतिक्रिया दिली.




