सोलापूर
वटवृक्ष मंदीर मनाला शांती देणारे स्थान – आ.गोपीचंद पडळकर

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – येथील श्री वटवृक्ष मंदिरातील पावित्र्य हे अनेक स्वामी भक्तांचे मानसिक समाधान प्राप्त करण्याचे स्थान आहे. एक निस्सीम स्वामी भक्त या नात्याने आपणांसही वटवृक्ष मंदिरात व येथील पवित्र वातावरणात मनाला शांती देणारे अनुभव आले असल्याचे मनोगत महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येथील वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर बोलत होते. यावेळी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आ.गोपीचंद पडळकर यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे बोलताना आ.गोपीचंद पडळकर यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील सुशोभीकरण व गाभारा नूतनीकरणाचे भव्यदिव्य स्वरूप पाहून मंदिर समितीचे विशेष कौतुक केले. येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गाभार्याचे स्वरूप बदलून मूळ स्वरूपाची रंगछटा दिल्याने गाभार्याचे स्वरूप अत्यंत सुबक व मनमोहक दिसत आहे. या दृष्य अनुभवातून स्वामी दर्शनाचा आनंद द्विगुणीत होऊन नयनरम्य गाभाऱ्यातून स्वामी दर्शनाची भव्यता अनुभवण्यास येत असल्याचे मनोगतही आ.गोपीचंद पडळकर यांनी याप्रसंगी व्यक्त करून महेश इंगळे यांनी भाविकांच्या सोयीकरिता मंदिर समितीच्या माध्यमातून राबवित असलेल्या विविध उपक्रमांना व मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, संजय पवार, संतोष पराणे, बंटी नारायणकर, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, विपूल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.



