मनोरंजन

महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार “लक्ष्मीकांत बेर्डे”

आज 26 ऑक्टोबर. महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार “लक्ष्मीकांत_बेर्डे” यांचा आज दि. 26 ऑक्टोबर जन्मदिवस.
विनोदाच्या या बादशहाला अन त्याच्या अजरामर कलेला विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा….
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.
लक्ष्मीकांत यांना सुरवातीपासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरवात गणेश उत्सवातील स्टेज शो पासून केली, कोकणस्थ वैश्य समाज आणि शाळा कॉलेज मधील कार्यक्रमात सुद्धा भाग घेतला आणि त्या मध्ये खूप सारे पारितोषिक सुद्धा जिंकले आहेत. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांत आपल्या कारकिर्दीतील पहिला अभिनय केला तो म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या “टूर टूर” ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांतला खरा ‘ब्रेक थ्रू’ मिळाला तो ‘टुरटुर’ या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली.
मग लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. ‘लक्ष्या’ या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला मराठी सिनेमा तो म्हणजे “लेक चालली सासरला”. त्यांचा दुसरा सिनेमा होता तो महेश कोठारे यांच्या सोबत. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला “दे दना दन” आणि काय तो सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडला आणि आपला लक्ष्या मराठी माणसाच्या घराघरात पोहचला. त्यानंतर त्यावेळचे मराठी सुपर स्टार अशोक सराफ यांच्या सोबतचा “धूम धडाका”. हे दोन्ही सेनिमा त्यावेळचे सुपर हिट्स सिनेमे होते. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपर हिट सिनेमे केले. त्यांनी शेवटपर्यंत मराठी चित्रपटसृष्टीवर आपले साम्राज्य गाजविले. १९८६ ते १९९६ या काळातील त्यांचे काही गाजलेले चित्रपट आम्ही दोघे राजा राणी, हमाल दे धमाल, अशी ही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, एका पेक्षा एक, भूताचा भाऊ, थरथरत आणि झपाटलेला. आणि लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट श्रुष्टीचे सुपर स्टार झालेत. . त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही. कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते.
त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला ‘कॅश’ करण्यासाठी ‘चल रे लक्ष्या’ मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले. त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले.
मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदी‍त चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली. मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एक होता विदुषक’ या गंभीर भूमिकेने लक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत. रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला.
असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. पण किडनीच्या आजाराची माहिती इतरांना न देता हलक्या पावलांनी १६ डिसेंबर २००४ रोजी या जगातून निघून गेला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button