सामाजिक
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत २८ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

डॉल्बीला फाटा; प्रत्येक गणेश मंडळात सीसीटीव्ही बंधनकारक
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यंदा गणेशोत्सवात डॉल्बीचा वापर टाळण्याच्या सूचना दिल्या असून, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात येत आहे.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७५ गावे असून, त्यापैकी तब्बल २८ गावांमध्ये यंदा ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रत्येक गणेश मंडळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच उत्सव काळात शांतता राखून आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाला यंदा विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठीही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
विनोद घुगे
पोलीस निरीक्षक, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे यांनी
गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.



