राजकीय

उपकाराची जाण नसलेले ‘आपलेच’ अन् सोलापुरात सुभाष देशमुखांना संपवण्याचा  ‘गेमप्लॅन’! 

​”राजकारणात मतभेद असतात, पण मनभेद नसतात,” हे वाक्य केवळ भाषणापुरतं मर्यादित राहिलंय का? कारण सोलापूरच्या राजकीय आखाड्यात सध्या जो खेळ रंगलाय, तो बघून हेच वाटतं. एक काळ असा होता जेव्हा सोलापूरसारख्या भागात भारतीय जनता पार्टीची पाळेमुळे सुद्धा नव्हती, तेव्हा एका नेत्याने तिथे भाजपचं जाळं विणलं. त्याच नेत्याला आज भरसभेत अशी खंत व्यक्त करावी लागते की, “आम्ही शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आयुष्यभर निवडणुका लढवल्या, पण त्यांनी विरोधी पक्षात असूनही आम्हाला कधीच त्रास दिला नाही. दुर्दैवानं आपल्याच पक्षातील काही लोक हे उपकारांची जाण ठेवत नाहीत.”
​माजी सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री, तसेच दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या तोंडून आलेले हे शब्द केवळ एक राजकीय विधान नाही, तर ती एका प्रस्थापित नेत्याला संपवण्यासाठी रचलेल्या गेमप्लॅनची उघड झालेली खदखत आहे. दक्षिण सोलापूरमधील होटगी येथे एका स्थानिक कार्यक्रमात, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते, तिथे सुभाष देशमुखांनी आपल्याच पक्षांतर्गत विरोधकांवर जो रोष ओढला, तो अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. हा रोष केवळ एका व्यक्तीवर नाही, तर एका संपूर्ण व्यवस्थेवर आहे.
​पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि वाढती नाराजी –
या सगळ्या राजकीय घुसळणीत सगळ्यात आधी नाव समोर येतं ते जयकुमार गोरे यांचं. साताऱ्यातील माण तालुक्याचे असले तरी ते सोलापूरचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री झाल्यापासून स्थानिक प्रशासकीय आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांचा थेट हस्तक्षेप वाढला आहे. सोलापूरच्या स्थानिक राजकारणावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या सुभाष देशमुख आणि सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना डावलून गोरे परस्पर निर्णय घेतात, असा देशमुखांचा आक्षेप आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात सुरू असलेली ही लुडबुड देशमुखांना साहजिकच मान्य नव्हती. यातूनच नाराजी इतकी वाढली की, जयकुमार गोरे यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे सुभाष देशमुखांनी चक्क पाठ फिरवली. इतकेच नाही तर, सोलापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची त्यांनी आवर्जून बालाजी सरोवर हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली. हा देशमुखांचा स्थानिक नेतृत्वाला केलेला १०० टक्के उघड विरोध होता.
​महापालिकेतील वर्चस्वाची लढाई –
सोलापूर महापालिकेच्या मैदानात आमदार देवेंद्र कोठे आणि देशमुख यांच्यात उडालेली राजकीय खडाजंगी या आगीत आणखी तेल ओतणारी ठरली. देवेंद्र कोठे यांच्या गटाकडे सुमारे ४० नगरसेवक होते, तर दुसरीकडे दोन्ही देशमुखांकडेही नगरसेवकांचा भक्कम आकडा होता. पण महानगरपालिकेवर स्वतःची पकड मजबूत करण्यासाठी आणि देशमुखांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी कोठे गटाने जोरदार खेळी केली आणि शेवटी कोठे गटाचे विनायक कोंडला हे सोलापूरचे महापौर बनले. सुभाष देशमुखांची देवेंद्र कोठेंवर नाराजी वाढण्याचं हे दुसरं मोठं कारण होतं.
​पारंपरिक विरोधकालाच पक्षात प्रवेश –
पण खऱ्या अर्थाने या नाराजी नाट्याचा स्फोट झाला तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे सुभाष देशमुखांचे पारंपरिक राजकीय विरोधक मानले जातात. २००९ मध्ये मानेंनी तर २०१४ मध्ये सुभाष देशमुखांनी एकमेकांना धूळ चारत विजय मिळवला होता. इतका टोकाचा विरोध असतानाही बाजार समितीच्या निवडणुकीत वरिष्ठांच्या सूचनेनुसार अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजपतर्फे दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी हातमिळवणी केली. धक्कादायक म्हणजे दिलीप माने बाजार समितीचे सभापती झाले आणि काही महिन्यांतच त्यांचा भाजपमध्ये प्रवेशही झाला. भाजपच्या विचारांशी मेळ न खाणाऱ्या आणि स्वतःच्याच पारंपरिक विरोधकाला पक्षात घेऊन स्वतःसमोर नवा पर्याय उभा करण्याच्या या चालीमुळे सुभाष देशमुख प्रचंड संतापले.
​नेमकी रणनीती कोणाची? –
आता प्रश्न पडतो की, जयकुमार गोरे, देवेंद्र कोठे आणि दिलीप माने यांच्यासारख्या नेत्यांना एवढी ताकद कोण देत आहे? या सगळ्यांच्या मागे भारतीय जनता पार्टीची संघटना आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांची रणनीती कारणीभूत ठरतेय, असं म्हटलं जातंय. सध्याच्या धोरणानुसार पक्षाला नेहमीच नव्या आणि तरुण नेत्यांची फळी उभी करायची आहे. सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या दोघांचेही वय आता सत्तरीकडे पोहोचले आहे, त्यामुळे त्यांना पद्धतशीरपणे ‘साईडलाईन’ करण्याचं हे भाजपचं नवं धोरण दिसून येतं. पण हे करत असताना पक्ष हे विसरत आहे की, सोलापूरच्या राजकारणात आपण कितीही नाकारलं तरी हे दोन्ही देशमुख एक स्वतंत्र ध्रुव आहेत आणि या दोघांची एकत्रित ताकद कोणाहीपेक्षा जड आहे. आपल्याला साईडलाईन केलं जातंय हे लक्षात येताच त्यांनीही या व्यवस्थेविरोधात थेट आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. मागे जेव्हा चंद्रकांत पाटील, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारखे भाजपचे वरिष्ठ नेते सोलापूर दौऱ्यावर आले होते, तेव्हा या दोन्ही देशमुखांनी पक्षाच्या अधिकृत कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आपली तीव्र नाराजी दाखवून दिली.
​सुभाष देशमुखांचा हा संताप अत्यंत स्वाभाविक आहे. १९९० च्या दशकात जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचं एकहाती वर्चस्व होतं, भाजपचा जनसंपर्क अजिबात नव्हता, तेव्हा या एका माणसाने संपूर्ण जिल्ह्यात भाजपचं जाळं पसरवलं. १९९८ मध्ये काँग्रेसची मोठी ताकद असतानाही ते भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर निवडून गेले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूरमधून त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. लोकमंगल समूहाच्या माध्यमातून सहकार, कृषी आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठं काम उभं केलं. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुका जिंकून त्यांनी सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री म्हणूनही मंत्रिमंडळात आपलं वजन सिद्ध केलं. सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे यांच्यासारख्या तरुण नेत्यांना ताकद दिली जात आहे हे खरं असलं, तरी शून्य असलेल्या पक्षाला आपला घाम गाळून ज्यांनी उभं केलं, त्यांनाच अचानक साईडलाईन केलं जात असेल, तर “लोकांना उपकाराची जाण उरलेली नाही” हे त्यांचं बोलणं अगदी बरोबर आहे. जर मुद्दा फक्त वयाचा असेल, तर महाराष्ट्राने वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत राजकारणाची कास धरलेले अनेक मातब्बर नेते बघितले आहेत.
​त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरिष्ठ नेतृत्वाने जर दोन्ही देशमुखांची ही नाराजी वेळीच दूर केली नाही, तर पक्षांतर्गत गटबाजीचा एक अत्यंत मोठा आणि न भरून येणारा राजकीय फटका सोलापूर भाजपला बसू शकतो हे निश्चित!
​ ‘विषय हार्ड’ फेसबुक पेजवरून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button