महाराष्ट्र

कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्षे अत्याचार, आरोपीला अटक

अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला संतापजनक प्रकार

अहिल्यानगर –  जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या ढवळपुरी येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्री. दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व कीर्तनकार असलेला आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्षे धाक दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अघोरी घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकत असल्यापासून म्हणजेच २०२१ सालापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या घराशेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे एकमेकांशी चांगले संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत होता. याच ओळखीचा गैरफायदा घेत मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. तिने विरोध करताच, ‘मी पूर्वी दोन खून केले आहेत, जर तू कोणाला काही सांगितलेस तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला जिवे मारीन’, अशी भयंकर धमकी त्याने दिली. कुटुंबाच्या जिवाच्या भीतीने पीडितेने हा सर्व त्रास अनेक वर्षे मुकाट्याने सहन केला.
१० मार्च २०२६ रोजी या अत्याचाराची परिसीमा गाठली गेली. आरोपीने पीडितेला फोन करून स्वतःच्या घरी बोलावले. तिने नकार देताच त्याने पुन्हा कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. या भीतीपोटी ती तिथे गेली असता, आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबू आणि चापट्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातील गॅसवर लोखंडी पकड तापवून तिच्या शरीरावर चटके देत अमानुष कृत्य केले. या निर्दयी मारहाणीमुळे तिला साधे चालणेही कठीण झाले होते.
अखेर १४ मार्च २०२६ रोजी तिचा भाऊ घरी आल्यावर त्याने बहिणीची ही दयनीय अवस्था पाहिली. त्याने तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने मावस भावांच्या उपस्थितीत मागील पाच वर्षांपासून सुरू असलेली ही संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर कोणताही विलंब न लावता भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पारनेर पोलिसांनी आरोपी यशवंत एकनाथ थोरात याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत अत्यंत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button