सामाजिक

करमाळ्यात जागतिक महिला दिनानिमित्त ‘कायदेविषयक जागर’ संपन्न

करमाळा तालुका विधी सेवा समिती,वकिल संघ आणि यशकल्याणी संस्थेचा स्तुत्य उपक्रम; महिलांनी कायद्याचे कवच धारण करण्याचे आवाहन
करमाळा ( आयुब शेख ):
“स्त्री हा समाजाचा कणा आहे आणि हा कणा अधिक मजबूत करण्यासाठी तिला कायद्याचे बळ मिळणे आवश्यक आहे. केवळ कायदे असून चालणार नाही, तर त्यांचे ज्ञान तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) मा. श्री. एस. एम. घुगे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती करमाळा, तालुका वकिल संघ करमाळा आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था,पुणे, (शाखा करमाळा) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ०९ मार्च २०२६ रोजी ‘यशकल्याणी सेवाभवन’ येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘कायदेविषयक जागरूकता शिबिरात’ ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्री.गणेश कर-पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि साहित्यिक शैलीत केले. “अज्ञान हे शोषणाचे मूळ आहे, म्हणूनच ‘ती’ला कायद्याचे शस्त्र बहाल करण्यासाठी या जागरुता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सह दिवाणी न्यायाधीश मा. श्रीमती एस. पी. कुलकर्णी यांनी ‘कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा २००५’ आणि ‘हुंडा प्रतिबंधक कायदा’ यावर सखोल मार्गदर्शन केले. घरगुती छळाविरुद्ध दाद कशी मागावी आणि स्त्रियांनी स्वतःच्या सन्मानासाठी कसे उभे राहावे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
प्रमुख वक्त्या अॅड. सविता शिंदे यांनी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ आणि ‘पोस्को’ (POCSO) कायद्याची माहिती देताना बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यातील कडक तरतुदींची अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे, हे उदाहरणांसह पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. घुगे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘जल संवर्धन, जल पुनर्भरण आणि प्रदूषणमुक्त पाणी’ या सामाजिक विषयाला कायद्याच्या चौकटीतून मांडले. तसेच मागील दशकात महिलांसाठी अमलात आलेल्या नवीन कायद्यांची माहिती देऊन महिलांनी निर्भयपणे अन्यायाचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. श्री. ए. एच. पठाण, अॅड. अमर शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. एम. बी. चांदणे मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अॅड. एस. एस. शिंदे मॅडम यांनी मानले. या शिबिराला गिरधरदास देवी विद्यालय आणि नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, माता-भगिनी, विधी सेवा समितीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशकल्याणी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button