इंधन तुटवड्याच्या अफवांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

घरगुती गॅस दरांत ६० रुपयांची वाढ
मुंबई – जागतिक पातळीवर अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. सध्या देशात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत काही अडचणी जाणवत असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५० ते २०० रुपयांची अनपेक्षित वाढ झाली आहे. यामुळे हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांनाही याची झळ बसत असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ६० रुपयांनी वधारल्या आहेत. काही शहरांमध्ये गॅसचा पुरवठा खंडित झाल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या सर्व घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात किंवा देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, काही प्रसारमाध्यमांनी चुकीची माहिती पसरवून नागरिकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मागील दोन-तीन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, भारत सरकारने यासंदर्भात आपली भूमिका अतिशय स्पष्ट केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची ऊर्जा सुरक्षा अबाधित राखण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली आहेत. कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा खंबीरपणे सामना करण्यासाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याव्यतिरिक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाईंदर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिला प्रतिनिधींसाठी ‘नारीशक्ती संगम’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील महिलांपर्यंत अधिक प्रभावीपणे कशा पोहोचवता येतील, याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात येत आहे.




