सामाजिक
अक्कलकोटचा अभिमान : पद्मभूषण डॉ. सुधा मूर्ती यांचा थेट दूरध्वनीवरून धानय्य कौटगीमठ यांचे अभिष्टचिंतन

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : जगप्रसिद्ध लेखिका, राज्यसभा सदस्य, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेल्या थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसेविका, दानशूर व्यक्तिमत्त्व व इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुधा मूर्ती यांनी आज सकाळी ९.३० वाजता अक्कलकोट येथील के.एल.ई. मंगरुळे हायस्कूलचे शिक्षक डॉ. धानय्य गुरुलिंगय्या कौटगीमठ यांना थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून तब्बल १३ मिनिटांचा संवाद साधला. यावेळी त्यांनी कौटगीमठ यांचे पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
डॉ. कौटगीमठ यांनी नुकतेच “डॉ. सुधा मूर्ती यांचे साहित्यविश्व : एक अन्वेषण” या विषयावर सविस्तर प्रबंध सादर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. या संशोधनासाठी त्यांनी तब्बल अकरा वर्षे मनःपूर्वक श्रम घेतले. ही माहिती समजताच स्वतः डॉ. सुधा मूर्ती यांनी फोन करून कौटगीमठ यांना विविध सखोल प्रश्न विचारले.
त्यांनी विचारलेल्या प्रश्नांत – “माझेच साहित्य संशोधनासाठी का निवडले? उद्दिष्ट काय होते? कोणत्या घटनांनी प्रेरित केले? शाळेच्या जबाबदाऱ्यांसह संशोधन कसे साध्य झाले?” अशा मुद्द्यांचा समावेश होता. याशिवाय महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कोणत्या कथा अभ्यासक्रमात घेतल्या आहेत, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील शिक्षणव्यवस्था, कन्नड- मराठी भाषांचे संबंध, स्थानिक लोककला व संस्कृती, तसेच के.एल.ई. संस्थेचे शैक्षणिक कार्य यांविषयीही त्यांनी रस घेतला.
या प्रसंगी डॉ. मूर्ती यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नंदाजी कदम यांच्याशीही संवाद साधून शाळेची शैक्षणिक कामगिरी व विद्यार्थ्यांची संख्या जाणून घेतली. त्यांनी कौटगीमठ यांच्या साधेपणा, नम्रता, अभ्यासू वृत्ती, समाजाभिमुखता तसेच NET/SET परीक्षा तब्बल ७९ वेळा उत्तीर्ण होऊन केलेल्या जागतिक विक्रमाचे आणि आता पर्यंत यू ट्यूब चॅनेल मार्फत सेट नेट टी इ टी परीक्षा संदर्भात मोफत मार्गदर्शन कन्नड , मराठी, इंग्रजी भाषेत करीत आहेत आणि आता पर्यंत १०५२ विद्यार्थी सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत यांची ही कौतुक केले.
डॉ. मूर्ती यांनी त्यांच्या कथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तसेच कौटगीमठ यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे लवकरच पुस्तक स्वरूपात प्रकाशन व्हावे यासाठी त्यांनी सहमती दर्शविली आणि निकट भविष्यात बेंगळुरू येथे प्रत्यक्ष भेटण्याचे आश्वासनही दिले.
या संशोधनप्रवासात डॉ. टी.एन. कोळेकर (दयानंद कॉलेज, सोलापूर) यांचे मार्गदर्शन आणि डॉ. शिवाजी शिंदे (सहायक कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ) यांचे अमूल्य सहकार्य लाभले. शाळेत दूरध्वनी आल्यानंतर श्री. सचिन डफळे व श्री. मधु धुळगोंड यांनी कौटगीमठ यांना तांत्रिक मदत केली.
या अभिमानास्पद प्रसंगानंतर मुख्याध्यापक नंदाजी कदम, उपमुख्याध्यापक जी.बी. पट्टेद, पर्यवेक्षिका सौ. आरती तोलनूरे, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग यांनी डॉ. धानय्य कौटगीमठ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांचा गौरव केला.
ही घटना केवळ अभिनंदनापुरती मर्यादित नसून, ज्ञान, साधेपणा आणि साहित्याच्या सामर्थ्याने शिक्षक-विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी एक ऐतिहासिक क्षण ठरली आहे.
चौकट -शिक्षण शिकतच रहा ,समाजासाठी त्याचा उपयोग करा असे मी मनापासून आशीर्वाद देते
डॉ सुधा मूर्ती , पद्म भूषण साहित्यिक
चौकट -मला डॉ सुधा मूर्ती यांच्या साहित्या वर पी एच डी पदवी मिळाले त्या आनंदा पेक्षा मला जास्त आनंद आज पद्म भूषण पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ सुधा मूर्ती मॅडम यांच्या सोबत संवाद केलो आणि आशीर्वाद मिळाले .हा क्षण माझ्या साठी अतिशय आनंद आणि अभिमानाचा सुवर्ण क्षण .
डॉ धानय्या कौटगीमठ
सह शिक्षक , के एल ई मंगरूळे हायस्कूल अक्कलकोट