डॉ. मोहन कांबळे यांना “गुरु गौरव राष्ट्रीय पुरस्कार – 2025” प्रदान

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) –
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्य करणाऱ्या, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागवणाऱ्या डॉ. मोहन भिमराव कांबळे यांना यंदाचा “गुरु गौरव राष्ट्रीय पुरस्कार – 2025” प्रदान करण्यात आला आहे.
हा मानाचा पुरस्कार नवलभाऊ प्रतिष्ठानचे व्ही. एन. पाटील लॉ कॉलेज, संभाजीनगर आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. देशभरातील प्रेरणादायी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यंदा डॉ. मोहन कांबळे यांची निवड होणे ही संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.
डॉ. मोहन कांबळे हे नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत, ते केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर एक उत्तम समाजप्रबोधक आणि विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, कार्यशाळा, सामाजिक जागृतीपर व्याख्याने, तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्रांचे यशस्वी आयोजन केले आहे.
या विशेष प्रसंगी प्राचार्य डॉ. सुरेश जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रसिद्ध वक्ते सागर सोनकांबळे, अमोल सरवदे, अॅडव्होकेट शरद कोकाटे, डॉ. प्रकाश पगारे, डॉ. संतोष भैलुमे, डॉ. संतोष जाधव यांनी डॉ. मोहन कांबळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सत्कार केला.
डॉ. मोहन कांबळे यांचा विद्यार्थीप्रिय व लोकसंग्रही स्वभाव, स्पष्ट विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी यामुळे ते शिक्षण क्षेत्रात एक प्रभावी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, त्यांनी हा पुरस्कार सर्व शिक्षक बांधवांना व विद्यार्थ्यांना अर्पण केला आहे.
या यशानंतर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळातून डॉ. मोहन कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



