महाराष्ट्र
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

नागपूर –
भारताचे सरन्यायाधीश . भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी या सर्वांनी पार्कच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान हातात धरलेल्या पुतळ्याचे अनावरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या महाविद्यालयातून आम्हाला भारतीय संविधानाचे धडे मिळाले, त्या महाविद्यालयातच आज संविधानाच्या उद्देशिकेचे दर्शन घडवणारा सुंदर पार्क तयार झाला, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.” यावेळी त्यांनी या कार्यात योगदान दिलेल्या समितीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, भारताचे संविधान हे जगातील सर्वात संपन्न संविधान आहे. हे तयार करत असताना, आंबेडकर यांनी जागतिक मूल्ये आणि शाश्वत भारतीय मूल्यांची अतिशय उत्तम सांगड घातली आहे. त्यांनी समतेचे, न्यायाचे आणि संधीच्या समानतेचे मूल्य जपणारे संविधान निर्माण केले. म्हणून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये असा पार्क तयार होणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले की, संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, हा निर्णय आम्ही संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात घेतला. नागपूर जिल्ह्यात पालकमंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मोठ्या जोमाने राबवण्यात आला आणि 80% घरांमध्ये उद्देशिका पोहोचली. उर्वरित घरांपर्यंतही ती पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये आपण स्वीकारली तर देशातील 90% प्रश्न कायमचे सुटतील, हे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी त्यांनी सांगितले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या संविधानालाच देतात. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची नवी इमारत तयार करण्याचे नियोजन असल्याचे देखील संगितले. यासोबतच आपल्या चारित्र्यात या विधी महाविद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि इतर मान्यवरांची उपस्थित होते.
