राजकीय
अक्कलकोटमध्ये गुरुवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील राजकीय धुरंधर काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आणि कार्यकर्ता मोकळा झाल्याने आणि आता काँग्रेसचे पुढे काय हा मुख्य प्रश्न निर्माण झाल्यानंतर तसेंच राजकीय उलथापालथीनंतर उद्या गुरुवार, ता.26 जून रोजी दुपारी एक वाजता प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात
काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
आयोजित करण्यात आला आहे,
अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष
मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली.
या मेळाव्यास माजी केंद्रीय
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,
खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री
सतेज पाटील, खासदार विशाल
पाटील, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष
अँड. नंदकुमार पवार, सोलापूर
शहराध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेस नेते
अश्पाक बळोरगी, माजी नगराध्यक्ष
डॉ. सुवर्णा मलगोंडा, सातलिंग
शटगार, अरुण जाधव आदी
उपस्थित राहणार आहेत.
अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस
पक्षाला दीर्घ परंपरा लाभली असून,
हा पक्ष पुन्हा एकदा वैभवाकडे
वाटचाल करावा, यासाठी आम्ही
प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी
सांगितले. या मेळाव्यातून काँग्रेसची
एकसंध ताकद जनतेसमोर उभी
राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.तालुक्यात मागील दहा बारा दिवसापासून गावभेट दौरा कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण व्हावा यासाठी
काँग्रेसच्यावतीने राबवला गेला आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी आणि
जनतेशी थेट संवाद साधला जात
आहे. या उपक्रमाला स्वयंस्फुर्त
प्रतिसाद लाभत असून त्याच
बळावर काँग्रेसची पुढील वाटचाल
निश्चित करण्यात येईल, असेही
पाटील म्हणाले. मल्लिकार्जुन पाटील यांची
तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर
प्रथमच असा मेळावा होत असून,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या काही महिन्यांत स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
होणार असल्याने काँग्रेसची पुढील
भूमिका काय असणार याची
घोषणा या मेळाव्यात होण्याची
शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत
उत्सुकता निर्माण झाली आहे.सध्याचे काँग्रेस पदाधिकारी सदर मेळावा प्रचंड यशस्वी व्हावा यासाठी कसोशीने प्रयत्न व नियोजन करण्यात येत आहे.