देश - विदेश

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

आज बॉलिवूडचा ही-मॅन अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (२४ नोव्हेंबर २०२५ रोजी) निधन झाले.
धर्मेंद्र यांचा अल्पपरिचय.
जन्म. ८ डिसेंबर १९३५ पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहनेवाल गावी.
१९६० ते १९८० या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणून  धर्मेंद्र यांची ओळख होती. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितक्याच सहजपणे अनेक अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि ‘गरम धरम’ अशा नावाने पण ओळखले जात असे. 
धर्मेंद्र यांचे खरे नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल. धर्मेंद्र यांचा जन्म एका जाट शीख कुटुंबात झाला. धर्मेंद्र यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लालटन कलान येथे केले, वडील सरकारी शाळेचे हेडमास्टर असल्यामुळे घरात शिक्षणाचे वाताववरण मिळाले आणि त्यांचे बालपण सानेहवाल इथेच गेले. पंजाब युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘फिल्मफेअर न्यू टॅलेंट’ स्पर्धेत ते विजेते ठरले आणि हाच त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. येथूनच त्यांचा मुंबईकडे येण्याचा आणि बॉलिवूडचा मेगास्टार होण्याचा प्रवास सुरू झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड होती. एकदा त्यांनी सुरैयाचा “दिल्लगी” हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला एका गॅरेज आणि ड्रिलिंग फर्ममध्ये काम केले. त्यावेळी त्यांचा पगार फक्त २०० रुपये होता,  
   १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत  ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.  धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत असंख्य सुपरहिट चित्रपट दिले.
दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना केवळ ५१ रुपये मानधन मिळालं होतं. निर्मात्यांनी त्यांना बोलावलं मानधनाविषयी बोलू लागले. ऑफिसमध्ये 3 केबिन होत्या. तीन केबिनमध्ये तीन जण होते. प्रत्येकाने त्यांच्या खिशातून १७ रुपये काढले आणि धर्मेंद्र यांना ५१ रुपये दिले. या पहिल्या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, परंतु धर्मेंद्र यांची मेहनत आणि त्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यानंतर ‘शोला और शबनम’, ‘अनपढ़’, ‘बंदिनी’, ‘हकीकत’, ‘फूल और पत्थर’, ‘अनुपमा’, ‘दो रास्ते’, ‘आदमी और इंसान’ अशा अनेक चित्रपटांकडून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. सिनेउद्योगात त्यांची स्थान अधिक दृढ झाले. त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्स आणि स्वभावातील सज्जनता यामुळे ते घराघरांत पोहोचले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले.अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली. शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तब्बल एका वर्षात ७०  पेक्षाही जास्त हीट चित्रपट देण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही.  धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भाचा अभय देओलसाठी सोचा ना था चित्रपटाची निर्मिती केली. 
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्किस’ हा येत्या 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना २०१२ साली पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.  तसेच १९९७  मध्ये फिल्मफेअर लाइफटाईम अचिव्हमेंट, तर १९९० मध्ये त्यांच्या निर्मितीतील ‘घायल’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  चित्रपटांव्यतिरिक्त धर्मेंद्र ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय गुंतवणुकीतून पैसे कमवायचे. त्यांच्याकडे मुंबईत एक आलिशान बंगला आणि खंडाळा आणि लोणावळा येथे फार्महाऊसशिवाय इतर अनेक रिअल इस्टेट प्रॉपर्टीज देखील आहेत. त्यांचे ‘गरम-धरम’ ही प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन देखील असून त्यांची रेस्टॉरंट्स अनेक शहरांमध्ये बरीच प्रसिद्ध आहेत.
धर्मेंद्र त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामुळे वारंवार चर्चेत राहिले. त्यांनी दोन लग्न केली होती. धर्मेंद्र यांनी पहिले लग्न १९५४ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी केले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नव्हते. प्रकाश कौर यांच्यापासून धर्मेंद्र यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या. याचा अर्थ ते चार मुलांचे वडील झाले.
अभिनेता धर्मेंद्र यांची चार मुले सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल आहेत. सनी देओल आणि बॉबी देओल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या दोन्ही बहिणी, विजेता देओल आणि अजिता देओल, प्रसिद्धीपासून दूर राहतात. धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले स्थायिक आहेत.
धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये प्रकाश कौर यांच्याशी घटस्फोट न घेता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. हेमा मालिनी त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहेत. अभिनेत्रीशी लग्न केल्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या, ईशा देओल आणि अहाना देओल. धर्मेंद्रची सर्व मुले स्थायिक झाली आहेत. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल याचे लग्न पूजाशी झाले आहे. त्याअजूनही प्रसिद्धीपासून दूर आहेत. त्यांना करण आणि राजवीर असे दोन मुलगे आहेत. ते लवकरच बॉलिवूडमध्ये आपले करिअर सुरू करण्याची अपेक्षा आहे.
 धर्मेंद्र यांचा दुसरा मुलगा बॉबी देओल आहे. त्याचे लग्न त्याची बालपणीची मैत्रीण तान्या आहुजा हिच्याशी झाले आहे. त्यांना आर्यमन आणि धरम ही दोन मुले आहेत.धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुली, विजेता आणि अजिता, अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसतात. लग्नापासून दोन्ही बहिणी परदेशात राहत आहेत. दोघीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. विजेता आणि अजिता यांना प्रत्येकी दोन मुले आहेत. धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्यापासून दोन मुली आहेत. त्यांची पहिली मुलगी ईशा देओल हिनेही बॉलिवूडमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने २०१२ मध्ये उद्योगपती भरत तख्तानीशी लग्न केले. आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. ईशा देओल यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत.धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची सर्वात धाकटी मुलगी अहाना देओल आहे. तिचे लग्न उद्योगपती वैभव वोहरा यांच्याशी झाले आहे. त्यांना तीन मुले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button