शैक्षणिक

सोलापुरात रंगणार कन्नड भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लाक्षणिक उपोषण; २० जून रोजी आंदोलनाचा एल्गार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक अल्पसंख्याक समुदायाच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘आदर्श कन्नड बळग, महाराष्ट्र’, शिक्षक समिती सोलापूर कन्नड विभाग, सर्व शिक्षक महासंघ आणि विविध कन्नड संघटनांच्या एकत्रित पुढाकाराने येत्या २० जून २०२६ रोजी सोलापूर शहरात एका भव्य लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आंदोलन दुपारी ठीक १:०० वाजता सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोरील नियोजित उपोषण क्षेत्रावर पार पडणार आहे. सीमावर्ती भागातील तमाम कन्नड प्रेमींनी या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
आंदोलनातील प्रमुख १० मागण्या:
माध्यमाची सुलभता: – शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही सक्तीने कन्नड भाषेतूनच आयोजित केली जावी.
 प्रशासकीय परीक्षा: केंद्रप्रमुख पदासाठीची परीक्षा कन्नड माध्यमातून घ्यावी, अथवा या पदांवर कन्नड भाषेचे ज्ञान असणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
 शिक्षक भरती: – कन्नड माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात.
 प्रवर्ग समन्वय:- एसटी (जमाती) प्रवर्गातील रिक्त शिक्षक पदे इतर पात्र प्रवर्गातून भरून उमेदवारांना न्याय द्यावा.
 शिक्षकांचे समायोजन: कन्नड शाळांमध्ये कार्यरत असलेल्या मराठी भाषिक शिक्षकांची बदली मूळ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये करण्यात यावी.
 द्विभाषिक अंगणवाडी सेविका:सीमावर्ती भागातील अंगणवाडी सेविकांना कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषांचे ज्ञान असणे बंधनकारक करावे.
 अटींमध्ये शिथिलता: अंगणवाडी सेविकांच्या थेट भरतीसाठी इयत्ता १२ वीत मराठी विषय उत्तीर्ण असण्याची जाचक अट पूर्णपणे रद्द करण्यात यावी.
 आर्थिक पाठबळ: ‘बसवेश्वर महामंडळा’च्या वतीने कन्नड शाळांच्या सक्षमीकरणासाठी विशेष निधी व अनुदान मंजूर व्हावे.
 उच्च शिक्षणाची सोय:सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‘बसवेश्वर विद्यापीठा’ची स्थापना करण्यात यावी.
 तांत्रिक सक्षमीकरण: कन्नड शाळांना पुरवण्यात येणारे संगणक, इंटरनेट अँटेना आणि इतर डिजिटल साधने वेळेत आणि सुस्थितीत उपलब्ध करून द्यावीत.
प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा उपस्थित संघटनांनी दिला आहे.
चौकट –
“आपली भाषा हेच आपले अस्तित्व आहे आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणे हे आपले कर्तव्य आहे. सीमाभागातील कन्नड भाषिकांवर सातत्याने होणाऱ्या भाषिक व प्रशासकीय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा एल्गार पुकारला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर आमच्या हक्कांची गळचेपी आता सहन केली जाणार नाही. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. सीमाभागातील प्रत्येक शिक्षक, पालक आणि तरुणाने आपल्या अस्मितेच्या या लढ्यात २० जून रोजी सोलापुरात मोठ्या संख्येने सामील व्हावे, ही नम्र विनंती.”
बसवराज गुरव
शिक्षक समिती राज्य कन्नड विभाग प्रमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button