सोलापूर

माढा तालुक्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दुष्काळी निकषानुसार मदत द्या; युवक काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

 

माढा (प्रतिनिधी) माढा तालुक्यात यावर्षी पावसाला मोठा खंड पडल्याने अनेक भागांत विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. पावसाअभावी पेरणी न झालेल्या क्षेत्रासोबतच अत्यल्प पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसारखी पिके करपून गेली असून ऊस पिकासह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

सदरील गंभीर परिस्थितीची दखल घेत आज रोजी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शाहुराजे ऊर्फ, अरविंद जगताप यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे एक मागणीपर निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात असे म्हटले आहे की; पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतांमध्ये जावून तातडीने पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी इथे करण्यात आली आहे.

तसेच, माढा तालुक्यातील कोरड्या दुष्काळी परिस्थितीचा प्रशासनाने गंभीरपणे विचार करून ताबडतोब असा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा आणि, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी निकषानुसार शासनाची आर्थिक मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी युवक काँग्रेस कमिटी यांच्यावतीने करण्यात आली.

> “शेतकरी संकटात असताना शासनाने पंचनामे आणि, मदतीसाठी वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय घ्यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळेपर्यंत युवक काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील” असा इशारा सदरच्या निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जहिर मणेर, सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, ओबीसी विभागाचे जिल्हा सरचिटणीस मोतिलाल सुतार, वाकाव गावचे माजी सरपंच दत्तात्रय सावंत, ग्रामपंचायत सदस्य भारत खंडागळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड.समाधान लटके, कामगार नेते गोरख वाकडे, शेतकरी नेते बालाजी चव्हाण यांच्यासह सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे तथा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि, शेतकरी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button