महाराष्ट्र
त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लाख भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन

परगावाहून आलेल्या दिंडी व पालखी परिक्रमांचे महेश इंगळेंनी केले स्वागत.
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनन्य साधारण महत्व आहे. या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मुर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी हजारो दिव्यांच्या दिपोत्सवाने वटवृक्ष स्वामींचे मंदिर उजळून निघेल. प्रारंभी आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदीर पहाटे ३ वाजता उघडण्यात आले. पहाटे ४ वाजता व ११:३० वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळेे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी, मंंदार पुजारी यांच्या हस्ते अनुक्रमे श्रींची काकड आरती व नैवेद्य आरती संपन्न झाली. त्यानंतर राज्याच्या पुणे, सातारा, मालेगाव, बार्शी, जेजुरी, भोर, फलटण, पिंपोडे, सावरगांव, धाराशीव, सोलापूर, मोहोळ, दौंड, कर्जत आदी विविध भागातून दिंडी सोबत पायी चालत येणारे पालखी सोहळे वटवृक्ष मंदिरात दाखल झाले. याप्रसंगी या दिंडी व पालखी सोहळ्याचे स्वागत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. या दिंडी व पालखीसोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास येथे भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. आलेल्या सर्व स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. पहाटे ३ ते रात्री उशीरापर्यंत या वेळेत अखंडपणे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. सर्व भाविकांना सुलभ दर्शन होणेकामी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वतः उभे राहून सर्व पुरुष व महिला स्वामी भक्तांना वेगवेगळया रांगेत प्रसंगी टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्याबाबत मार्गदर्शन केल्याने सुलभ दर्शन व्यवस्थेच्या माध्यमातून स्वामी दर्शनाचा लाभ होऊन कृतार्थ झाल्याची भावना उपस्थित स्वामी भक्तांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभ होण्यासाठी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे अक्कलकोट नोर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिकांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांसह मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



