सामाजिक
अक्कलकोट बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य ! वयोवृद्ध व महिला प्रवाशांना होतोय त्रास !

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथील बस स्थानक परिसरात अवकाळी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून त्याचा फटका हा वयोवृद्ध व महिला प्रवासी यांना बसला आहे .अक्कलकोट बस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे .याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला काहीच देणे घेणे लागत नसल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे .
अक्कलकोट नगरी ही अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे तीर्थक्षेत्र नगरी म्हणून ओळखली जाते. या नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त येत असतात. बसमधून अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. अक्कलकोट शहरातील बस स्थानकाचे भव्य असे बांधकाम सुरू असून या परिसरातच तात्पुरते बस स्थानक उभे करण्यात आले आहे. सध्या या तात्पुरत्या बस स्थानक परिसरात अवकाळी पावसामुळे चिखल साचले असून या चिखलातून अबाल वृद्ध प्रवाशांना बसमध्ये चढावे लागत आहे. अक्कलकोट बस स्थानक परिसरात सर्वत्र चिखल आणि पावसाचे पाणी साचल्याने यातूनच प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. सध्या अवकाळी पाऊस सतत पडत असून यामुळे बस स्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे .महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून बस स्थानक परिसरात प्रवाशांची होणारी कुचंबणा ओळखून मुरूम, खडी टाकून प्रवाशांची सोय करणे अपेक्षित आहे. पण याकडे बस स्थानक आगार प्रमुख तसेच अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गासह नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. परिवहन महामंडळाने प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात आहे.
