विकास बघण्यासाठी मोतिबिंदूचे ऑपरेशन करा , दसमेगाव येथील बैठकीतून प्रा डॉ . तानाजीराव सावंत यांनी विरोधकांना नाव न घेता लावला टोला

परंडा ( फारूक शेख )सर्वसामान्य माणसाला इथं विकास झालेला दिसतो, पण विरोधकांना विकास झालेला दिसत नाही. विकासावर काल भाष्य झालं, विकास नावाचा व्यक्ती त्यांच्याबरोबर फिरकला नाही वाटतं! सर्वसामान्य माणसाला विकास दिसतो, पण त्या नेत्यांना विकास दिसला नाही. त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करा, त्यांना दृष्टी द्या, असा टोला महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी त्यांच्यावर टीका करणार्या महाआघाडीच्या नेत्यांना लगावला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज (दि.११) प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची घोंगडी बैठक दसमेगाव येथे पार पडली. या बैठकीला कवडेवाडी, सशिळा (वाशी), सोनेगाव, दळवेवाडी, दसमेगाव, झीन्नर, घोडकी आदी गावातील ग्रामस्थ महिला, पुरूष व तरूणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रा. डॉ. सावंत म्हणाले, की या भूम-परांडा-वाशी मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे, तरी इथं विकास झाल्याचा विरोधकांना दिसत नाही, आता २३ तारखेलाच त्यांना कळेल, जनतेने विकासाला मतदान करून विजयी केल्यानंतर यांना विकास दिसेल. यांनी तेरणा कारखाना मोडीत काढला, त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. उजनीच्या पाण्याचा प्रश्न येणार्या गुढी पाडव्याला मिटणार आहे, त्यामुळे कुणीही चिंता करायची नाही. कारण तुमच्या या सेवकाने तुमच्या पाण्याची सोय केली आहे. यावेळेस विरोधकाचे डिपॉझीट जप्त केल्याशिवाय ही जनता स्वस्त बसणार नाही, असा इशाराही प्रा. डॉ. सावंत यांनी राजकीय विरोधकांना दिला.
या बैठकीला जिल्हा युवासेना प्रमुख बाळासाहेब नागरे, शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान गपाट, तालुका संघटक शिवहार स्वामी, गटनेते नागनाथ नाईकवाडे, बंडू खोसे, विकास तळेकर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पूजा उकिरडे, ललिता जगताप, सरपंच मिनाक्षी खोसे, उपसरपंच अमोल खोसे, अनिल खोसे, राजेभाऊ सावंत, महादेव क्षेत्रीय, राजगुरू महाराज, सरपंच पोपटराव मोरे, सुंदर उघड, सुरेश कवडे, बाळासाहेब मांगले आदींची उपस्थिती होती.