देश - विदेश

एपस्टाईन प्रकरणी हरदीप सिंग पुरींनी तात्काळ राजीनामा द्यावा

पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी – काँग्रेस पक्षाची जोरदार मागणी
आंदोलनात काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्षाच्या खासदारांचा सहभाग

नवी दिल्ली -अमेरिकेतील कुप्रसिद्ध बाल लैंगिक अत्याचारी व मानव तस्कर जे एपस्टाईन याच्याशी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव जोडले गेल्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मंत्री हृदीपसिंग पुरी यांनी अलीकडेच आपण एपस्टाईन याला दोन–तीन वेळा भेटलो असल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.
एपस्टाईनसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या व्यक्तीशी संबंध येणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याची टीका काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. नैतिकतेच्या प्रश्नावर केंद्र सरकार मौन बाळगत असल्याने जनतेमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज संसद भवन संकुलात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलनादरम्यान हरदीप सिंग पुरी यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
काँग्रेस पक्षाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा लज्जास्पद आणि नैतिकतेला तडा देणाऱ्या प्रकरणात संबंधित मंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी आणि या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी जाहीर करावी.
देशाच्या सन्मानाशी निगडित प्रश्नावर काँग्रेस पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही, आणि सत्य बाहेर येईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button