सोलापूर

प्रत्येक कुटुंबाकडे भारतीय संविधानाची प्रत असणे गरजेचे – न्यायाधीश अमित शर्मा

 

करमाळा ( प्रतिनिधी ) : प्रत्येक कुटुंबाकडे धर्मग्रंथाबरोबरच भारतीय संविधानाची प्रत असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण माणसाचं जगणं काय आहे आणि त्या जीवनामध्ये समाधान मिळवण्याचा जो मार्ग आहे, तो संविधानानेच आपल्याला दिला आहे, असे मत करमाळा येथील दिवाणी न्यायाधीश अमित शर्मा यांनी व्यक्त केले.
तालुका विधी सेवा समिती व करमाळा वकील संघ यांच्या वतीने पोथरे येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर ग्रामपंचायत सरपंच अंकुश शिंदे, वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. अलीम पठाण, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, ॲड. राहुल सावंत, ॲड . बलवंत राऊत, ॲड. नानासाहेब शिंदे यांच्यासह गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायाधीश शर्मा पुढे म्हणाले की, “प्रत्येक व्यक्तीला त्याच्या संकटप्रसंगी मार्ग काढायचा असेल तर भारतीय संविधान अत्यंत महत्त्वाचे आहे. संविधानातील कलम 14 ते 21 आणि कलम 32 ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या कलमांमुळे प्रत्येक माणसाला मिळालेल्या हक्कांची जाणीव होते आणि त्याचबरोबर आपली कर्तव्ये काय आहेत हे समजते. संविधानामुळेच आज देशात अनेक वेगवेगळे कायदे निर्माण झाले असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.”
या शिबिरात ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी “ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व कायद्यातील तरतुदी” या विषयावर मार्गदर्शन केले, तर ॲड. राहुल सावंत यांनी “नागरिकांचे हक्क व कर्तव्य” याबाबत माहिती दिली. यावेळी अंगणवाडी सेविका सौ. मीरा नायकोडे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. बलवंत राऊत यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन अॅड. नानासाहेब शिंदे यांनी केले.
या वेळी सरपंच अंकुश शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास न्यायालयीन लिपीक प्रकाश करपे, चेअरमन प्रभाकर शिंदे, पंचायत समिती माजी सभापती किसनराव शिंदे, संचालक विठ्ठल शिंदे, माजी सरपंच ज्ञानदेव नायकोडे (माजी मुख्याध्यापक), दादासाहेब झिंजाडे, जे.टी. झिंजाडे, जयद्रथ शिंदे (माजी उपसरपंच), प्रेमराज शिंदे, सुनिल काळे , बबन जाधव, अंगद देवकते, विलास आढाव, राहुल झिंजाडे, शिवाजी जाधव, सुभाष शिंदे, शिवाजी शिंदे, हामिद शेख, विलास जाधव, बाळू कुलकर्णी, रामकृष्ण नायकोडे, ग्रामविकास अधिकारी हजारे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button