अभिनेते सतीश शाह

मुंबई -चित्रपटात कितीही छोटी भूमिका असली तर निर्दोष विनोदी टायमिंगने ती भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आघाडीवर नाव असणारे अभिनेते सतीश शाह यांचे आज दुपारी वाजता उपचार सुरु असताना वयाच्या ७४ व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले.
सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी मांडवी, कच्छ, गुजरात येथील चित्रपटाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे शिक्षण झेवियर कॉलेजमध्ये पूर्ण केले. शालेय जीवनात सतीश शहा यांना खेळाची आवड होती. ते बेसबॉल आणि क्रिकेट अगदी उत्तमरित्या खेळत असत. तसेच शालेय स्तरावरील हायजंप आणि लाँगजंपचे सतीश शहा चॅम्पियन होते. मात्र एकदा शाळेत असतांना स्नेहसंमेलनातील हिंदी नाटकात कलावंत मिळत नसल्याने, शिक्षकांनी जबरदस्ती सतीश शहा यांना रंगमंचावर अभिनय करायला लावला. नाईलाजाने सतीश शहा रंगमंचावर आले पण त्यांनी केलेल्या अभिनयाला स्टॅडिंग ओवेशन मिळाली. त्या दिवसापासून सतीश शहा यांना अभिनयाचा कीडा चावला आणि अभिनेता बनण्याच्या ध्यासाने महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफ. टी. आय. आय.) प्रवेश घेऊन अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. सतीश शाह यांच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ या चित्रपटातून झाली, त्यानंतर ‘गमन’ (१९७९), ‘उमराव जान’ (१९८१), ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ (१९८१) आणि ‘शक्ती’ (१९८२) या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या.
१९८३ मध्ये, कुंदन शाह यांच्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामध्ये त्यांनी महानगरपालिका आयुक्त डी ‘मेलो ही भूमिका साकारली. सतीश शाह यांनी भ्रष्ट नगरपालिका आयुक्त आणि नंतर त्यांचे मृत शरीर म्हणून केलेल्या अभिनयाने त्यांना चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून मान्यता मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली. या भूमिकेमुळे त्यांना विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
सतीश शाह यांनी १९८४ मध्ये ‘ये जो है जिंदगी “या त्यांच्या टी.व्ही. मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत देशभरातील घराघरात लोकप्रिय झाले. या मालिकेत त्यांनी ६० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. यातून त्यांचे अभिनयाचे अष्टपैलूत्व अधोरेखित झाले.. ‘बीवी तो बीवी साला तो साला “(१९९६),’ मस्त मस्त है जिंदगी” (१९९७), ‘घर जमाई “(१९९७) आणि’ नेहले पे देहला” (१९९९) या मालिकातून त्यांची छोट्या पडद्यावरील कारकिर्द बहरत राहिली. “साराभाई व्हर्सेस साराभाई (२००४)” या मालिकेमध्ये इंद्रवदन साराभाई ही भूमिका ही त्यांची सर्वात आवडती दूरचित्रवाणी भूमिका होती. विनोदी, बेफिकीर परंतु अत्यंत प्रेमळ माणसाची त्यांची व्यक्तिरेखा आजही सिनेरसिकांनी स्मरणात ठेवली आहे.
१९८६ साल सतीश शाह यांच्या जीवनातील सर्वात दुःखदायक साल होते. तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या आई आणि वडील दोघांचेही निधन झाले. त्यानंतर अनेक दिवस सतीश शाह यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. चार दशकांहून अधिक कारकीर्द आणि २५० हून अधिक चित्रपट असलेले सतीश शाह यांचा भारतीय विनोदी अभिनेता म्हणून चित्रपटांवरील प्रभाव अतुलनीय आहे. पडद्यावरील स्क्रीनटाइमची पर्वा न करता, प्रत्येक भूमिकेत जीव ओतून ती समरसतेने साकारण्याच्या त्यांच्या कौशल्याने त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रिय अभिनेता म्हणून प्रसिध्दी मिळाली आहे.
रुपेरी पडद्यावरी सतीश शहा यांनी ‘परम धरम’ (१९८७), ‘घरवाली बाहरवाली’ (१९८८), ‘मालामाल’ (१९८८), ‘वीराना’ (१९८८), ‘घर घर की कहानी’ (१९८८), ‘हिरो हीरालाल’ (१९८८), ‘साथ साथ’ (१९८९), ‘शक्ती’ (१९८९), ‘मोहन जोशी हाजिर हो! (१९८९) हातिम ताई (१९९०) थानेदार (१९९०) बेनाम बादशाह (१९९१) नरसिम्हा (१९९१) बॉम्ब ब्लास्ट (१९९३) आशिक आवारा (१९९३) कभी हां कभी ना (१९९४) हम आपके हैं कौन..! (१९९४) दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९४) अकेले हम अकेले तुम (१९९४) साजन चले ससुराल (१९९६) हिरो नं. 1 (१९९७) कहो ना प्यार है (२०००) फिर भी दिल है हिंदुस्तानी (२०००) साथिया (२००२) चलते चलते (२००३) कल हो ना हो (२००३) मैं हूं ना (२००४) फना (२००६) ओम शांति ओम (२००७) भूतनाथ (२००८) यासह अनेक गाजलेल्या चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्यात. त्यांनी हिंदीसह मराठीतील वाजवा रे वाजवा या चित्रपटात साकारलेला बाबूलाल जैन आजही मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तसेच शांति शांति शाति या कन्नड चित्रपटातही त्यांनी अनंथा मूर्ती ही भूमिका साकारली होती.
वैयक्तिक आयुष्यात सतीश शाह यांनी १९८२ मध्ये डिझायनर मधु शाह यांच्याशी विवाह केला. सुरुवातीच्या नकारांनंतरही, सतीश यांच्या अतूट प्रेमाने त्यांनी अखेरीस मधु यांचे मन जिंकले व दोघांचा प्रेमविवाह सफल झाला. सतीश शाह यांनी ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमाच्या ज्युरी पॅनेलचे सदस्य म्हणूनही काम केले आणि २०१५ मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. २०२० मध्ये कोविड काळात त्यांना कोविड झाल्याने लिलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते व २८ जुलै २०२० ला त्यांना रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी चित्रपट स्वीकारणे बंद केले होते.अखेरच्या काळात ते किडनी विकाराने ग्रस्त होते. १८ ऑक्टोबरला किडनीचे कार्य बंद झाल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना २५ ऑक्टोबर २०२५ ला दुपारी २.३० ला सतीश शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. भावपूर्ण श्रद्धांजली!



