राजकीय

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची नवी राजकीय “इनिंग” कितपत फलदायी ठरणार !

अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड )अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे  हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडून दिली आहे. माजी मंत्री म्हेत्रे यांनी नवीन राजकीय भूमिका जाहीर करत काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यांची नवी राजकीय ” इनिंग “कितपत फलदायी ठरणार याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे. सत्तेच्या परिघा बाहेर प्रदीर्घ काळापासून असणारे सिद्धाराम म्हेत्रे आता शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून सत्तेत जाणार असल्याने त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 राज्यातील राजकीय क्षेत्रात या अगोदर पक्षांतराच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषता काँग्रेस पक्षातून सत्तेसाठी अनेक नेत्यांनी भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेत काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही ३१  मे रोजी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षास धक्का दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सात वेळा बैठक घेऊन चर्चा करून माजी मंत्री म्हेत्रे हे शिवसेना शिंदे गटात जात असल्याचे त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे. माजी मंत्री म्हेत्रे हे काँग्रेस पक्षावर नाराज असल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीच साथ मिळत नसल्याने तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने माजी मंत्री म्हेत्रे हे शिवसेना शिंदे गटात जात असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता म्हेत्रे यांच्यासारखा मोठा  नेता असा निर्णय का घेत आहेत  याचा विचार काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी करणे गरजेचे आहे. एखाद्या पक्षाची प्रतिमा उंची वाढविण्यासाठी जनमानसातील नेत्याची गरज पक्षाला असते. याचा विचार काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करायला हवा. चार वेळा आमदार, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री राहिलेले सिद्धाराम म्हेत्रे यांचा राजकीय अनुभव तसेच काम हे मोठे आहे. याचा फायदा हा आता शिवसेना शिंदे गटात नक्कीच होणार आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढणार आहे .शिवसेना शिंदे गटामुळे तिसरा राजकीय पर्याय कार्यकर्त्यांना लाभणार आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नव्या राजकीय इनिंग मुळे मात्र काँग्रेस पक्षावर परिणाम होणार असून  भाजपाला याचा कितपत फटका बसेल हे आगामी काळात दिसणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे  गटाची ताकद दिसणार आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसेच त्यांचे बंधू काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची नवी राजकीय इनिंग कितपत लाभदायी ठरणार तसेच या नव्या राजकीय बांधणीला जनता कितपत साथ देणार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसणार आहे. माजी मंत्री म्हेत्रे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने या प्रवेशाची चर्चा मात्र अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील राजकीय क्षेत्रात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button