राजकीय
आहे तिथच बरं आहे – माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील

अक्कलकोट (प्रतिनिधी ) भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार का ? या प्रश्नावर अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी आहे तिथेच बरं आहे. काँग्रेस पक्ष सोडणार नाही अशा शब्दात पक्षांतराच्या उठणाऱ्या अफवांना उत्तर दिले. काँग्रेस पक्षाचे युवा नेते मल्लिकार्जुन पाटील यांना पत्रकाराने पक्षांतरासंदर्भात छेडल्या असता त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
सध्या अक्कलकोट तालुक्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व युवा नेते मल्लिकार्जुन पाटील यांच्या पक्षांतराच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरविल्या जात आहेत. सर्वत्र या राजकीय विषयाची खमंग चर्चाही अक्कलकोट विधानसभेच्या वर्तुळात रंगत असते. काँग्रेस पक्षाचे युवा नेते माजी जि प सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जेऊर या त्यांच्या गावी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे .या संदर्भात माहिती देण्यासाठी मल्लिकार्जुन पाटील यांनी १२ मार्च रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते .या पत्रकार परिषदेत त्यांच्या राजकीय पक्षांतरा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार का ? या प्रश्नावर मल्लिकार्जुन पाटील यांनी काँग्रेस पक्षात आहे तिथेच बर आहे. इतर पक्षात जाणार नाही. काँग्रेस पक्ष सोडणार नाही. राजकारणात बदल होत असतात. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार येतच नाही. काँग्रेस पक्षाला अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात वैभव मिळवून देण्यासाठी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले. बोलणारे बोलत असतात अफवा उठविणारे अफवा उठवतात याकडे पत्रकारांनी लक्ष देऊ नये असे मल्लिकार्जुन पाटील यांनी स्पष्ट सांगितले. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे युवा नेते मल्लिकार्जुन पाटील हे पक्षांतर करणार अशी अफवांची चर्चा अधून मधून रंगत असते. यावर मात्र मल्लिकार्जुन पाटील यांनी पडदा टाकला असून काँग्रेस पक्ष कदापी सोडणार नाही असे सांगितले.