सामाजिक
लहुजी शक्ती सेनेच्यावतीने२९ जुलै पासून हलगीनाद आंदोलन

सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर
अक्कलकोट:-(प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत विविध योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आणि अक्कलकोट तालुक्यात चौकशी समितीने केलेल्या चौकशीची फेर चौकशीच्या मागणी संदर्भात येत्या २९ जुलैपासून विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर कार्यालय आणि पूनम गेट जिल्हा परिषद समोर लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी पत्रकारांना दिली. त्या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे.
सन २०१७ ते २०२३ दरम्यान जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागांमध्ये शासनाच्या विविध योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची स्वतंत्र चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. या प्रमुख मागणीसह अक्कलकोट येथील सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी समितीने भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांना पाठीशी घालत केलेल्या चौकशीची फेर चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
सामाजिक वनीकरण विभागास एनटीपीसी आणि शासकीय योजनेतून कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला. मात्र भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांनी त्या निधीचा रोपवाटिका, गट लागवड, रस्ता दुतर्फा, वृक्ष लागवड, आदी कामासाठी वापर केला नाही. ह्या विविध योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे. यासंदर्भात अक्कलकोट येथील सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराबाबत विविध वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत शासनाने चौकशी समितीची स्थापना केली. मात्र चौकशी समितीने दोन वेळेस दौरा करीत स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप वसंत देडे यांनी केला आहे. त्यामुळे चौकशी समितीची फेर चौकशी आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यातील झालेल्या विविध कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
मात्र प्रशासनाने निवेदन पत्र आणि स्मरण पत्राची दखल न घेतल्याने येत्या २९ जुलैला विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूरच्या कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर पूनम गेट जिल्हा परिषद समोर हलगीनाद, अर्ध नग्न, केस मुंडन, लाक्षणिक उपोषण आदी माध्यमातून रोज विविध आंदोलने करण्यात येणार असल्याचे वसंत देडे यांनी पत्रकारांना सांगितले.
