अजित फाऊंडेशन बार्शी तर्फे ‘आपला आधार’ वृद्धाश्रमाला किराणा साहित्याचे वाटप

परंडा / धाराशिव ( फारूक शेख ) – समाजातील निराधार वयोवृद्ध नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीतून अजित फाऊंडेशनने एक विधायक उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत, ब्रम्हगाव (ता. परंडा) येथील ‘आपला आधार’ वृद्धाश्रमात 500 किलो किराणा साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वाटपामध्ये तूरडाळ, मसूरदाळ, हरभरा, तांदूळ, ज्वारी, राजमा, मूग, गरा, साखर आणि उबदार ब्लँकेट्स यांचा समावेश होता. वृद्धाश्रमातील गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन ही मदत करण्यात आली.या उपक्रमात अजित फाऊंडेशनचे कार्यकर्ते व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य ही या सेवाभावी कार्याची खरी पावती ठरली.
‘आपला आधार’ वृद्धाश्रमाचे अध्यक्ष झुल्फिकार काझी यांनी सांगितले, “आमच्या संस्थेत राहणाऱ्या निराधार वृद्धांची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असून, ग्रामीण भागात अशा सेवा सुरू ठेवण्यासाठी समाजाची साथ महत्त्वाची आहे. अजित फाऊंडेशनने केलेली मदत आम्हाला खूप मोठा आधार ठरली. समाजातील प्रत्येकाने अशा कार्यात सहभागी व्हावे, हीच अपेक्षा.”
या वेळी आधार संस्थेचे तौफिक मशायक, सोहेल काझी व वृद्धाश्रमातील नागरिक उपस्थित होते.
चौकट: -अजित फाऊंडेशनने आधार वृद्धाश्रमाला आधार देऊन खर्या अर्थाने आधार देऊन वृद्धसेवेचे पाऊल उचलले आहे. समाजातील अशा घटकांना कुटूंबाचा आधार समजून ही मदत केली आहे.
— महेश निंबाळकर, अध्यक्ष – अजित फाऊंडेशन.



