देश - विदेश
अक्कलकोट तालुक्यातील रस्ते कामासाठी मल्लिकार्जुन पाटील यांची दिल्लीवारी

खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट..
चेन्नई सुरत ग्रीनफिल्डच्या शेतकऱ्यांना न्याय द्या…
अक्कलकोट ( प्रतिनिधी )- श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट तालुक्यात अलीकडच्या काळात परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत.यामुळे तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक विकासनिधीची तरतूद करण्यात यावी,या मागणीसाठी अक्कलकोट कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या सहकार्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे संसद भवन परिसरात भेट घेतली.
या भेटीबद्दल बोलताना मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखाली सध्या अक्कलकोट तालुक्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत.परंतु ही कामे प्रगतीपथावर आहेत.पण या कामाव्यतिरिक्त आम्ही गडकरी यांना सुचविलेल्या रस्तेकामांचा शासकीय दर्जा सुधारुन आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.तसेच तालुक्यात सध्या सुरू असलेल्या चेन्नई सुरत ग्रीनफिल्डच्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात मोबदला देण्यात आला आहे.त्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा,अशी मागणी केली.
ना.गडकरी यांनी मल्लिकार्जुन पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत अक्कलकोट तालुक्यातील रस्तेकामासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.तर ग्रीनफिल्डच्या शेतकऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यास सांगितले.यावेळी खासदार प्रणिती शिंदे,खासदार विशाल पाटील आदी उपस्थित होते.



