Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मराठी साहित्य संमेलन आणि महात्मा फुलेंची दूरदृष्टी

Admin by Admin
January 3, 2026
in सामाजिक
0
मराठी साहित्य संमेलन आणि महात्मा फुलेंची दूरदृष्टी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठी साहित्य संमेलन आणि महात्मा फुलेंची दूरदृष्टी.

कुणीतरी विश्वास पाटील नावाचे मराठी भाषेतील एक लेखक आहेत. अर्थात ते आहेतच. वा असतीलही. परंतु मला प्रश्न पडतो की, लिहिणारे लॊक इतके लोचट आणि इतके लाचार का असतात? या मातीत अत्यंत स्वाभिमानी असे लिहिणारे लोक होऊन गेले आहेत. पण मग तरीही कुठलाही कवडीचाही स्वाभिमान नसलेले लोक लेखक का असतात? अशी माणसे साहित्यिक असतात का? फार तर ती दरबारी भाट असू शकतात. “बिघडलेला गाव सुधरायचा असेल तर पाटील आणि कुलकर्णी यांना युती करावीच लागते.” असं हे सरंजामी बाण्याचे लेखक काहीतरी बोलले. हा महाराष्ट्र रोज बिघडतो आहे. महाराष्ट्रात जी अभूतपूर्व राजकीय अनागोंदी सुरू आहे. अक्षरशः धाकदपटशा दाखवून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता बिनविरोध केले जात आहेत. लोकशाही नावाच्या गोष्टीची वासलात लावणे सुरू आहे. या आत्यंतिक किळसवाण्या स्थितीत असलेल्या महाराष्ट्र देशाची जी दयनीय अवस्था आहे त्या अवस्थेत हे पाटील नावाचे सरंजामी बाण्याचे लेखक वरील जातीय युतीची स्वप्ने पाहत आहेत. आपण आधुनिक युगात आहोत की मध्ययुगात आहोत? याची या लेखकरावाला थोडीही जाणीव नसावी. अशी विधाने त्यांनी सरकारपुरस्कृत अ.भा.सा.संमेलनाच्या मंचावरून केली आहेत. या सरंजामदार लेखकांना ब्राह्मणांचं प्रमाणपत्र हवंय. त्यांच्या मान्यतांशिवाय हे भाट जगूच शकत नाहीत. यांच्याकडे कुठल्या भूमिका आहेत? विचारांना वाळवी लागलेले हे लोक. ते मराठी भाषेविषयी बोलू शकत नाहीत की तिच्या अनास्थेविषयी बोलू शकत नाहीत की या महाराष्ट्रात महापुरानं गिळून घेतलेल्या, देशात अव्वल नंबरच्या शेतकरी आत्महत्यांविषयी बोलू शकत नाहीत, की राजरोसपणे जंगले, डोंगर, झाडे तोडून हा सह्याद्री उजाड करणारांविरोधात ते बोलू शकत नाहीत. मग काय हवंय यांना? आयता सरंजाम आणि उरल्यासुरल्या पाटिलकीचे मृतावशेष? मनोरंजन! मनोरंजन! मनोरंजन!

पण आमचे पूर्वसुरी आम्हाला सांगून गेले आहेत की,
“बरे झाले देवा कुणबी केलो।नाहीतरी दंभेचि असतो मेलो॥”
कुठे आहे हा सगळा अत्यंत खालच्या स्तरावर येऊन स्वतःकडे माणूस म्हणून पाहण्याचा शहानपणा. यांच्याकडे तो नाहीच. तो येणारही नाही. कारण सांस्कृतिक गुलामगिरी आणि जातीय प्रतिष्ठेची मिरासदारी यांना मिरवायची आहे. त्यासाठीच हे लोक आपल्या कलमा झिजवून इथवर आले आहेत.

सांस्कृतिक गुलामगिरीचे अर्थ समजत असतील, तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही कधीच आपली गोष्ट नव्हती. वा आपली ती जागाच नाही. हे लक्षात न येण्याएवढे आपल्याकडील सांस्कृतिक निरक्षरत्व अफाट आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी तत्कालीन मराठी ग्रंथकार सभेस (आजचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) जे पत्र लिहिले, ते आजही तितकेच उचित ठरते. उलट जवळजवळ दीड शतकापूर्वी फुल्यांनी लिहिलेल्या पत्राचा अर्थ आपण लक्षात घेतला, तर या ग्रंथकारांच्या संमेलनांतून वाढलेला दूषितपणा काळाच्या तुलनेत अधिक आहे. हेच लक्षात येईल.

सांस्कृतिक राजकारणाबाबतची सजगता ही तमीळ व मल्याळम लोकांमध्ये जितकी आहे. तितकी ती आपल्याकडे नाही. तुलनेने आपल्याला त्यांच्यापेक्षा वारसा अधिक तगडा असला तरीही. अन्यथा फुले-शाहू-आंबेडकर असा जयघोष करणारे राजकीय लोक फुल्यांच्या ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्राचा अवमान करत साहित्य संमेलनांचे आयोजक झाले नसते. कारण, ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्रात फुले लिहितात की,

“माझ्या घालमोड्या दादा ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्याने खुशीने व उघडपणे देववत नाहीत. व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकातील भावार्थांशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही.”

पुढे ते लिहितात की,
“हे त्यांच्यातील उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभास्थानी आगंतूक भाषण करणारांस कोठून कळणार?”
सद्यस्थितीचा विचार करता आजही आपण त्याच स्थितीत आहोत हे वाटण्यासारखीच परिस्थिती आहे. की तिच्यात या १८८५ साली लिहिलेल्या पत्रानंतर या अखिल भारतीय संमेलनांच्या लेखक/आयोजक यांच्या भूमिकांमध्ये काही बदल झाले आहेत काय?

फुले पुढे लिहितात की,
“त्या दादांना (घालमोडे दादा) जर सर्वांची एकी करणे असेल, तर त्यांनी एकंदर सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधूप्रीति काय केल्याने वाढेल,त्याचे बीज शोधून काढावे. व ते पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावे. अशा वेळी डोळे झाकणे उपयोगाचे नाही. या उपर त्या सर्वांची मर्जी.”

न्यायमूर्ती रानडेंनी १८८५ साली भरवलेल्या ग्रंथकारांच्या दुसऱ्या संमेलनात फुल्यांना पत्र पाठवून येण्याची विनंती केली होती. त्या पत्राला उत्तर म्हणून महात्मा फुल्यांनी पत्र पाठवले होते.

१८८५ सालची स्थिती आणि आजची स्थिती यात नेमके काय बदल झाले? याचा विचार आपण आजही करू शकतो. महत्त्वाचे हे आहे की, फुल्यांच्या पत्राचा सार जर आपण लक्षात घेतला, तर आपल्याला समजेल की, आपण ज्या शेतकरी, शोषित,वंचित,शूद्रातिशूद्र अशा अत्यंत विपरीत परिस्थिती असलेल्या समाजघटकांतून येतो, त्यांच्याविषयीची काहीएक भूमिका या संमेलनांतून मांडतो का? मांडली जाते का? या समाजघटकांच्या प्रतिनिधित्वाची चर्चा तिथे होते का? किंवा त्यांचे तेथील प्रतिनिधित्व काय आहे?

देशभरात सुरू असलेल्या घटनांबाबतच्या चकार शब्दांची आपण येथे अपेक्षा करू शकत नाही. कारण फुले ज्या मानवी हक्कांविषयी बोलत आहेत, त्याचा लवलेशही या सांस्कृतिक सत्तेवरील लोकांकडून अपेक्षित नाही. कारण जाणिवानेणिवांचा आपण विचार केला तर त्या आधारे अजूनही फुल्यांचं ग्रंथकार सभेस लिहिलेलं पत्र आजही जसच्या तसं लागू पडतय. उलट या ग्रंथकारांच्या संमेलन स्थितीत अधिकचं महोत्सवी सांस्कृतिक अशा वर्चस्वाचं दूषितपण आलं आहे.

केवळ पर्याय महत्त्वाचे नसतात. तर भूमिकांना चालना मिळण्यासाठी पर्यायी सहभाग अधिक महत्त्वाचे असतात. तुमच्यातील सांस्कृतिक गुलामगिरी अधिक आहे. ती का आहे. हे फुल्यांनी ग्रंथकार सभेस पाठवलेल्या पत्रातून अधिक समजून घेता येईल. किंबहुना समग्र फुले वाङमय हे आपल्या सर्वांच्या सांस्कृतिक गोष्टींसाठीचे दिशादर्शकच आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्यांनी किमान फुल्यांनी ग्रंथकार सभेस लिहिलेले पत्र वाचावे. किंवा त्या पत्रातील कालचा आणि आजचा असा दोन्ही काळांना लागू पडणारा आशय समजून घेणे गरजेचे आहेच.

आयोजक नंतर पत्रिका बदलतात. नावे बदलतात किंवा. अन्य काही कारणे काढून सारवासारवही करत असतात. पण आपली सांस्कृतिक निरक्षरता कबूल करत नाहीत. इतके ते निब्बर कातडीचे असतात.

माझे मित्र Pradeep Kokare यांनी या यावर्षीच्या संमेलनात ‘काळी कपडे घालून येऊ नये’ या फतव्या विरोधात तिथे जी सडेतोड भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.

तुकोबा लिहितात की,
“माझिया मीपणावरी पडो हे पाषाण।जळो हे भूषण नाम माझे॥”

इतक्या उंचीचं लिहिणारे स्वाभिमानी लोक या मराठी भाषेत होऊन गेले आहेत. त्यांचे वारस असण्याचा अभिमान आम्हाला निश्चित आहे. याशिवाय कुणी कुठे जावे? कुठल्या संमेलनात सहभागी व्हावे? आणि काय कृती करावी? हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण भूमिकेत रहावे. लाचार वा लोचट होऊ नये. ही साधी अपेक्षा आहे. कारण, महाराष्ट्र हा शब्द स्वाभिमान असाच लिहिला जावा. त्यात अंतर पडतेय. ते पडू नये हीच माफक अपेक्षा. थांबतो.

श्रीकांत ढेरंगे
मु.आंबी दुमाला
ता.संगमनेर.

Previous Post

पंडीत. भिमण्णा जाधव व  गुंडम्मा जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

Next Post

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भयमुक्त वातावरणात मतदान होण्यासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

Admin

Admin

Next Post
सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भयमुक्त वातावरणात मतदान होण्यासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : भयमुक्त वातावरणात मतदान होण्यासाठी महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697