ग्रामीण भागात प्रचाराचा जोर वाढला
अक्कलकोट (स्वामीराव गायकवाड ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात अवघ्या काही दिवसांवर निवडणूकसाठी मतदान होणार आहे. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीसाठी दिवाळीनंतर आता राजकीय फटाके मोठ्या प्रमाणात फुटू लागल्याने मतदारांमध्ये याची चर्चा रंगली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सर्वच उमेदवारांचा प्रचाराचा जोर वाढला आहे. ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत नेते मंडळींची वर्दळ वाढल्याचे दिसत आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजप महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे. भाजपाचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी व काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. रात्रीचा दिवस करून उमेदवार हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. भाजपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती पक्ष बसपा मनसे यांच्यासह अपक्ष उमेदवाराकडून प्रचारासाठी जोर देण्यात आला आहे. रासप चे उमेदवार सुनील बंडगर यांनी ग्रामीण भागात प्रचारावर जोर दिला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनीही ग्रामीण भागात प्रचारासाठी दौरे करत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातील जाणकारातून व्यक्त केली जात आहे. दिनांक २० नोव्हेंबरला मतदान होणार असून प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी ग्रामीण भागात फिरून प्रचार करून पदयात्रा कॉर्नर सभा यावर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागात राजकीय फटाके फुटू लागल्याने मतदारांमध्ये याची चर्चा सुरू आहे .विकासाच्या मुद्द्यावर भाजपाचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी हे भर देत आहेत. अल्पावधीत झालेला विकास हे मतदारांना आमदार सचिन कल्याणशेट्टी सांगत आहेत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांनी उजनीचे पाणी तसेच विकास कामातील भ्रष्टाचार यावर जास्त फोकस दिल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या सोबत माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र रमेश पाटील आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील प्रचार सभांमध्ये सहभागी होत असल्याने त्याची चर्चा रंगली आहे. राजकीय उमेदवार हे एकमेकांवर टीका करत असल्याने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात दिवाळीनंतर राजकीय फटाके जोराने फुटू लागल्याने मतदारांमध्ये याची चर्चा रंगली आहे.





