अक्कलकोट (स्वामीराव गायकवाड ) सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून महिला मतदारांना लाडकी बहीण म्हणून गोंजारण्याचे काम सुरू असल्याने महिला मतदारांचे वजन वाढले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकी दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात पार पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देण्यात आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे त्यांच्या बँकेच्या खात्यात दरमहा 3 हजार रुपये जमा करण्यात येत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सध्याच्या सत्ताधारी पक्षांकडून झाला आहे. लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केल्याने सत्ताधारी भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आशा पल्लवीत झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारची चांगलीच धोबी पिछाड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीचा पराभव केल्याने राज्यातील महायुतीच्या सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेद्वारे महिला मतदारांना दरमहा 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. याची अंमलबजावणी सुरू केली असून राज्यातील लाखो महिलांना तीन हजार रुपये बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत .राज्य सरकारच्या या योजनेवर महिला या अक्षरशा तुटून पडले आहेत. यामुळे राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या आशा पल्लवीत झाले आहेत. ही योजना किती काळ सुरू राहणार याची गॅरंटी कोणीच देण्यास तयार नाही. पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. याचा धसका हा महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्यातील महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे .राज्यातील विधानसभा निवडणुकी ही लाडक्या बहिणीभोवती फिरत असल्याचे दिसत आहेत. राज्यातील लाखो महिला मतदारांना गोंजारण्याचे काम सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून व विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सुरू आहे. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती ही महिला मतदारांभोवती फिरत असून महिला मतदारांचे सध्यातरी वजन वाढले आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून महिला मतदारांना गोंजारण्याचे काम सुरू असून याला महिला मतदार किती भुलल्या हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिसणार आहे .सध्या तरी महिला मतदारांना केंद्रस्थानी मानून राजकीय डाव टाकण्याची स्पर्धा राजकीय पटलावर दिसत आहे.





