मनात जिद्द व डोळस प्रयत्न असतील तर सामान्य माणूसही असामान्य होऊ शकतो. अवघे विश्व कवेत घेऊ शकतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याचे उत्तम उदाहरण आहेत. डॉ. राधाकृष्णन म्हणजे एक ऋषितुल्य तेजस्वी व्यक्तिमत्त्व. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रकांड पांडित्याने जगभर लौकिक संपादन केला. भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय जगाला करून देणारे स्वामी विवेकानंद यांच्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांचेच नाव गौरवाने घेतले जाते. शुद्ध चारित्र्य, प्रकांड पांडित्य, अपार सहिष्णुता आणि प्रभावी, वक्तृत्व यामुळे त्याना जगभर विलक्षण लोकप्रियता मिळाली. शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे.
५ सप्टेंबर १८८८ रोजी त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती दोन्ही पदे भूषविली. देशात आणि प्रदेशात त्यांनी अनेक सन्मान मिळविले. पण ते आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना आदरणीय वाटत होते, त्यामुळे त्यांचा जन्म दिवस ‘शिक्षकदिन ‘म्हणून पाळला जात होता.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे अत्यंत विश्वासू वृत्तीचे होते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्यांनी सतत पहिली श्रेणी मिळवून आपल्या बुद्धीची चमक दाखविली. त्यांचा तत्वज्ञान हा विषय अत्यंत आवडीचा होता. हा विषय घेऊन त्यांनी बी.ए.च्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाले. पुढे एम.ए.झाल्यावर प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. १९२१ साली म्हैसूरला नवीन विद्यापीठ स्थापन झाले. तेथे राधाकृष्णन तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून गेले तेथून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. १९२६ मध्ये इंग्लंडला भरलेल्या ‘आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदे ‘ साठी त्यांची भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली . पुढे अनेक देशात त्यांनी हिंदूंचे धर्मतत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. नंतर ते जग प्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून मान्यता पावले.
ऑक्सर्फर्ड विद्यापीठाने त्यांना खास आमंत्रण देवून धर्म, नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांवरील व्याख्यानांसाठी बोलविले होते. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ हि वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. ते १९५२ मध्ये भारतात परतताच त्यांना प्रथम उपराष्ट्रपती पदावर १९५२ ते १९६२ पर्यंत कार्यरत होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेता देहदंड न सोसता ते हिंदुस्थानातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतिपदावर आरूढ झाले. तो दिवस होता 13 मे 1962 . भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब बहाल केला.
राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम त्यांनी आपल्या दहा हजार रुपये पगारात कपात करून केवळ अडीच हजार रुपये पगार घेण्याचा निर्णय घोषित केला. भूतपूर्व अर्थमंत्री स्व. सी. डी. देशमुख तेव्हा केवळ एक रुपया पगार घेत होते. त्याकाळी जास्तीतजास्त कोण त्याग करतो अशीच स्पर्धा होती. सिमल्याचे भव्य वैभवशाली प्रसाद जे ब्रिटिश व्हाइसरॉयसाठी बांधण्यात आले होते, ते एका संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी देऊन ते राष्ट्रपती भवनात राहावयास आले.
डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपतिपदावर विराजमान होताच चीनने हिंदुस्थानावर आक्रमण केले. पंतप्रधान पंडित नेहरूंचा ‘हिंदी चिनी भाई भाई’ हा नारा हवेतच विरला. त्या वेळी डॉ. राधाकृष्णन पुढे सरसावले व आणीबाणी जाहीर केली. या दोन महापुरुषांनी देशाला मदतीचे आवाहन केले दोघेही त्यागी अन् चारित्र्यसंपन्न. अवघ्या देशाचा त्यांच्यावर विश्वास. लक्षावधी तरुण पुढे आले, मातृभूमीसाठी सैन्यात भरती झाले. वस्त्र, धान्य, पैसा देशभरातून हजारो ट्रकांमधून येऊ लागले. हजारो महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने, मंगळसूत्र देऊन देशास सर्वतोपरी मदत केली. पक्षीय मतभेद दूर सारून जात-पात -धर्म पंथ विसरून लक्षावधी माणसे देशासाठी उभे राहिले. राष्ट्रपतिपद हे केवळ देखाव्यासाठी नसून घटनात्मकदृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वश्रेष्ठ पद आहे. हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या जवानांनीही या वेळी दाखवलेले शौर्य सुवर्ण अक्षरांनी लिहावे असेच आहे. चीनने अखेर माघार घेतली.
धर्म आणि तत्वज्ञान या विषयानप्रमाणेच त्यांचा या विषया वरही उत्तम अभ्यास झालेला होता.स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी १९४८ ला भारत सरकारने पहिला शिक्षण-आयोग स्थापन केला. त्या आय्गाच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. त्यांनी लेखनही भरपूर केले होते. त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाज्लेत. भारतीत धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारेहि त्यांचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्व:त च्या उदाहरणाने दाखवून दिले. आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसर्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.
विश्रांती हा शब्दच डॉ. राधाकृष्णन यांच्या शब्दकोषात नव्हता ते सच्चे देशभक्त होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मातृभूमीची सेवा केली आणि डोव्व्यांत तेल घालून राष्ट्रचे संरक्षण केले. देशाला आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रांत प्रामुख्याने स्थैर्य मिळवून दिले आणि जगभर देशाचा लौकिक वाढविला. अमेरिकेने ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हे सर्वोच्च पदक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच एडिनबरा विद्यापीठानेही गौरव केला. सोव्हियत रशियानेही त्यांचे भव्य स्वागत केले. जगभरातील विविध देशांशी त्यांनी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ.राधाकृष्णन यांनी खर्या गुरूची कल्पना अतिशय सर्वोत्कृष्ट शब्दात मांडली आहे. त्यांच्या मते खरा गुरु तोच जो विद्यार्थ्यांना केवळ बोद्धिक नव्हे तर अध्यात्मिक अंध:कारही नाहीसा करील. ज्याचा आचार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य ! तो विद्यार्थ्याला सद्गुण व चांगुलपणा याची प्रेरणा देत असतो. शिक्षक हा केवळ माहिती देत नाही तर आत्म्याची शक्ती तो शिष्या मध्ये जागृत करतो त्यांनी शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षण हि एक यांत्रिक क्रिया बनते. शिक्षक आपल्या समोर कोणते चारित्र्य पूर्ण आदर्श ठेवतात याचे महत्व मुलांना असते. डॉ.राधा कृष्णन हे हाडांचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती.
1967 मध्ये हिंदुस्थानात चौथी सार्वजनिक निवडणूक झाली. सर्व पक्षांचा आग्रह असतानाही ते राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाले आणि त्यांनी दिल्ली सोडली. आयुष्यातील शेवटचे दिवस वाचन, मनन-चिंतनात शांतपणे घालवावे म्हणून ते मद्रासला आले. शेवटची आठ वर्ष त्यांनी अत्यंत शांतपणे घालवली. 17 एप्रिल 1975 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सारे जग हळहळले, डॉ. राधाकृष्णन म्हणजे हिंदुस्थानचे सद्भाग्य, वैभवचैतन्य होते. ते महान आचार्य होते. असा ज्ञान महर्षी पुन्हा होणे नाही.







