Sunday, September 6, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पुरोगामी समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
November 9, 2025
in महाराष्ट्र
0
पुरोगामी समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, पहिल्या भारतीय महिला महाविद्यालयाचे संस्थापक, विधवा विवाहाचा आदर्श घालून देणारे पुरोगामी समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज पुण्यतिथी.
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.
रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.
त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी – पार्वतीबाई आठवले – या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘`निष्काम कर्म मठा’ची स्थापना इ.स. १९१० साली केली.
पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `’हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.
अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.
अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले. कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.
इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण’ हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न’ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

Previous Post

परंडा मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांची अखेर बदली

Next Post

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना एम एस सी बँकेकडे असलेले‌ रक्कम मिळवून दिल्याबद्दल कामगारांच्या वतीने संचालक ॲड. राहुल सावंत व ज्येष्ठ संचालक डॉ.हरिदास केवारे यांचा सत्कार

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना एम एस सी बँकेकडे असलेले‌ रक्कम मिळवून दिल्याबद्दल कामगारांच्या वतीने संचालक ॲड. राहुल सावंत व ज्येष्ठ संचालक डॉ.हरिदास केवारे यांचा सत्कार

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना एम एस सी बँकेकडे असलेले‌ रक्कम मिळवून दिल्याबद्दल कामगारांच्या वतीने संचालक ॲड. राहुल सावंत व ज्येष्ठ संचालक डॉ.हरिदास केवारे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158374
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697