अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक आणि सर्वसामान्य कुटुंबांसमोर पाणी, अन्न आणि रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे उत्पन्न घटले असून शेतमजूर व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला पुरेसे काम उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर पशुधनासाठी चारा व पाण्याची समस्या गंभीर बनत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळग्रस्त जनतेला तातडीने सरसकट मोफत धान्य वाटप करावे, रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून स्थानिक मजूर व कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विकीबाबा चौधरी यांनी केली आहे.
दुष्काळग्रस्त जनतेला केवळ आश्वासनांची गरज नाही, तर प्रत्यक्ष मदत आणि तातडीच्या शासकीय उपाययोजनांची गरज आहे. शासन व प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन विलंब न करता आवश्यक उपाययोजना कराव्यात.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देत असून, मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी विकीबाबा चौधरी यांनी केली आहे.






